The गडविश्व
गडचिरोली : कुरखेडा पंचायत समितीच्या वादग्रस्त बीडीओ अनिता तेलंग यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने ९ मार्च रोजी काढले आहेत. त्यांची बदली नागपूर जिल्हयातील भिवापूर येथे पंचायत समितीमध्ये करण्याता आल्याची माहिती आहे.
बीडीओ तेलंग यांची कारकीर्द कुरखेडा येथे मोठी वादग्रस्त राहिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनेक मुद्यावरून त्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती यामुळे अनेकदा खटके उडत होते. तेलंग याच्या मनमानी कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती सभागृहात अविश्वास ठराव सुध्दा घेतला होता. पंचायत समितीच्या मासिक सभेत ठरावाची अंमलबजावणी करण्यात कसून करणे, पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेणे, विशिष्ट हेतूने कर्मचाऱ्यांचा चौकशी अहवाल कार्यवाहीकरीता वरिष्ठ स्तरावर न पाठवता दडवून ठेवणे, महापुरूषांच्या जयंती कार्यक्रमांना दांडी मारणे आदी आरोप पंचायत समिती सदस्यांनी केले होती. याबाबत शासनाकडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्या तक्रारीची दखल घेत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने त्यांची बदली नागपूर जिल्हयातील पंचायत समिती भिवापूर येथे केली आहे.