– शिंदे सरकारची कसोटी, विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस
The गडविश्व
मुंबई ३ जुलै : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आज रविवार ३ जुलै आणि उद्या सोमवार ४ जुलै, २०२२ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत होती. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड आज रविवार ३ जुलै रोजी सभागृहात होणार आहे . विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.
आज अध्यक्षांची निवड आणि सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर आणि शिवसेनेकडून राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. विधानसभेत सरकारला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर निवडून येण्यात अडचण येणार नाही. अध्यक्षपदासाठी नव्या नियमानुसार आवाजी पद्धतीने मतदान होणार आहे. उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव पुकारल्यावर सदस्यांनी उभे राहून मत नोंदवायचे आहे.
या निवडणुकीत व्हिपवरून शिवसेना आणि शिंदे गटात जुंपण्याची शक्यता आहे. बंडखोरी केल्यानंतर शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेनेचे आमदार विधानसभेत आमने-सामने येणार आहेत. शिवसेनेकडून शिंदेंसह सर्व आमदारांना व्हिप जारी करण्यात आला आहे. पण, प्रतोद सुनील प्रभूंचा व्हिप आम्हाला लागू होत नसल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे. त्यामुळे पक्षादेशावरून बंडखोर आणि शिवसेनेत संघर्षाची शक्यता आहे.