आता 16 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा केला जाणार

235

– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

The गडविश्व
नवी दिल्ली : दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस देशात ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली. जे स्टार्टअपच्या जगात भारताचा झेंडा उंचावत आहेत, त्या सर्व स्टार्टअप उद्योजकांचे, तसेच कल्पक तरुणांचे पंतप्रधानांनी यावेळी अभिनंदन केले. स्टार्टअपची ही संस्कृती देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचण्यासाठी दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील 150 स्टार्टअप्स उद्योजकांसोबत संवाद साधला. यामध्ये कृषी, आरोग्य, उद्योजक, अवकाश, उद्योग 4.0, सुरक्षा, तंत्रज्ञान आधारित आर्थिक सेवा, पर्यावरण इत्यादींसह विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स या संवादात सहभागी झाले होते. 150 हून अधिक स्टार्टअप्सची सहा कार्यकारी गटांमध्ये विभागणी केली गेली होती. स्टार्टअप्स देशात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून राष्ट्रीय गरजांमध्ये कसे योगदान देऊ शकतात हे समजून घेणे हा या संवादाचा उद्देश होती.
विद्यार्थ्यांमध्ये नाविन्याचे आकर्षण निर्माण करणे हे आमचे ध्येय असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. देशात नावीन्यपूर्णतेचे आकर्षण लहानपणापासूनच निर्माण करणे आणि देशातील नाविन्यपूर्ण उपक्रमांना संस्थात्मक रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. 9,000 हून अधिक अटल टिंकरिंग लॅब आज मुलांना नवनवीन शोध आणि नवीन कल्पनांवर काम करण्याची संधी देत ​​आहेत. इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत सध्या 46 व्या क्रमांकावर आहे. सरकारचे वेगवेगळे विभाग, मंत्रालये ही तरुण आणि स्टार्टअप्सच्या संपर्कात राहतात. त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन देण्याचे काम करतात. तसेच अधिकाधिक तरुणांना नवनिर्मितीची संधी देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. नावीन्यपूर्णतेबाबत भारतात सुरू असलेल्या मोहिमेचा परिणाम चांगला परिणाम झाला आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स क्रमवारीत भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. 2015 मध्ये भारत या क्रमवारीत 81 व्या क्रमांकावर होता. आता इनोव्हेशन इंडेक्समध्ये भारत हा 46 व्या क्रमांकावर असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here