– आशाताईंचा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मान
The गडविश्व
गडचिरोली : आशाताई ही आरोग्य विभागाचा कणा असून ती आरोग्य विषयक कामे उत्तमरित्या करीत असल्याचे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. वर्षभर ग्रामीण भागात आरोग्य सेवा तेथील लोकांना समजविण्याचे कार्य आपण करत आहात. कोरोना काळात आशा वर्कस यांनी उत्तम कार्य केले असून कुटूंब नियोजन, कोविड लसीकरण या मोहिमेमध्ये त्यांनी गावोगांवी जाऊन काम केले आहे. मिशन पालवी अंतर्गत कार्य करतांना आशाताईंनी बाल मृत्यूदर कमी करुन मुलांचे प्राण वाचविले. अशा शब्दात आशाताईंचे कौतुक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण सोसायटी, गडचिरोली मार्फत जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट आशा व गटप्रवर्तक यांना जिल्हा, तालुका तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल सन्मान करण्याकरीता सर्वोत्कृष्ट आशा पुरस्कार सोहळयाचे आयोजन जिल्हा नियोजन भवन, गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. समीर बन्सोडे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल मडावी, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम, जिल्हा नोडल अधिकारी डॉ सचिन हेमके, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहूल ठिगळे हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा समुह संघटक व तालुका समुह संघटक यांनी उपस्थित राहुन सहकार्य केले.
यावेळी जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात आरोग्य सेवेमध्ये आशा वर्कर्स यांचा मोलाचा वाटा असून वर्षभर काम करतांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आपल्या परिवाराचे संगोपन करुन तुम्ही आरोग्य क्षेत्रात ग्रामीण भागात जिवापाड हे कार्य करित आहात हे वाखाळण्या जोगी कार्य आहेत. राज्य पातळीवर तसेच केंद्र पातळीवर घेतलेली दखल ही तुम्हच्या कामाची पावती आहेत असे मत व्यक्त केले.
जगामध्ये सर्वात जास्त मृत्यू हे क्षयरोगमुळे होतात. क्षयरोग रुग्णांना मासिक रु. 500 त्यांच्या आहारासाठी दिल्या जातात. जेणे करुन ते सुदृढ राहणार. क्षयरोग दिनानिमित्य आज जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या हस्ते कॅलेंडर, स्टिकर या सर्वांचे अनावरण करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यानी जिल्हयातील आशांची आरोग्य क्षेत्रातील कामगीरी प्रशंसनीय आहे तसेच आशा गटप्रवर्तक यांना ई-स्कूटर मिळण्यासंदर्भात राज्य शासनास प्रस्ताव पाठविलेला आहे. सोबतच आशा व गटप्रवर्तकांचा सेवा देतांना अपघात झाल्यास त्यांना जिल्हा स्तरावरुन मदतीकरीता तरतुद करण्यात येईल. तसेच आशांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या अडचणी आणि त्यांच्या मागण्यांबाबत शासन स्तरावर चर्चा करुन सोडविल्या जाईल. तसेच यावेळी आशा वर्कस यांनी आपले ग्रामीण भागातील आरोग्य विषयक अनुभव यावेळी व्यक्त केले.