– जांभुळखेडा भुसुरुंग स्फोटात शहीद झालेल्या जवानांना वाहिली श्रद्धांजली
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील आष्टी पोलीस ठाण्याच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त वृक्षारोपण तसेच जांभुळखेडा येथील भुसुरुंग स्फोटात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
आज १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ७.१५ वाजता ध्वजारोहन कार्यक्रम घेण्यात आला तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या संकल्पनेतून सकाळी ७.४५ वाजता आष्टी येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करून १२ वृक्षांची लागवड करण्यात आली.
तसेच गडचिरोली पोलीस दला अंतर्गत एक मे २०१९ रोजी जांभुळखेडा भूसुरुंग स्फोटात 15 जवानांना वीरमरण आले होते त्यांच्या स्मरणार्थ ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून पोलीस स्टेशन हद्दीतील आष्टी लक्ष्मणपुर ,वसंतपूर, अडपल्ली चेक, ईल्लुर, ठाकरी, दुर्गापुर मुधोली चेक नं. १, मुधोली रिट, अनखोडा, कढोली, सोमणपल्ली इत्यादी गावावरून नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून रक्तदान शिबिरामध्ये सहभागी व्हा असे आवाहन केले असता सदर नागरिकांनी स्वतः सहभाग घेऊन ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान करून शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सदर रक्तदान शिबिरामध्ये १२५ सर्व नागरिकांनी तसेच पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान केले.
सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे व उपविभागीय पोलिस अधिकारी अहेरी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात पोलिस आष्टी स्टेशन येथील सर्व अधिकारी व अंमलदार तसेच ग्रामीण रुग्णालय आष्टी येथील वैद्यकीय अधिकारी व त्यांचे कर्मचारी वृंदाच्या मदतीने संपन्न झाला.