– पुढील सुनावणी २ मार्च रोजी
The गडविश्व
मुंबई : ओबीसी आरक्षणासाठी अनेक दिवसांपासून राज्य सरकार आपला कायदेशीर लढा लढत आहे. पण विविध बाबींमुळे सतत सुनावणी पुढे ढकलली जात आहे. आज पुन्हा एकदा ओबीसी संदर्भातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाबाबत ठोस निकाल जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आता ओबीसी राजकीय आरक्षणाची सुनावणी बुधवार 2 मार्च रोजी होणार आहे.
निवडणुकीशी संबंधित दोन याचिकांवर एकाच वेळी सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता बुधवार २ मार्च रोजी ओबीसी आरक्षणावर सुनावणी होणार आहे. त्यानंतरच आगामी महापालिका निवडणुकीबाबत चित्र स्पष्ट होणार आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने १७ डिसेंबर रोजी ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू करता येणार नसल्याचे म्हटले होते. तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसीसाठीच्या राखीव जागा खुल्या प्रवर्गातल्या म्हणूनच गृहीत धरल्या जाव्यात असा आदेशही न्यायालयाने दिला होता.