– चांदाळा येथील दोन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
The गडविश्व
गडचिरोली, ७ जुलै : तालुक्यातील कुंभी शेतशिवारातील हातभट्ट्यांवर धाड टाकून दोन ड्रम मोहफुलाच्या सडव्यासह २० लिटर दारू जप्त केल्याची कारवाई गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या रविवारी केली. याप्रकरणी चांदाळा येथील दोन विक्रेत्यांवर गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चांदाळा गावात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जाते. या गावांच्या माध्यमातून तालुक्यातील बोदली, जेप्रा, जेप्रा चक, राजगाटा माल, राजगटा चक, उसेगाव व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गडचिरोली शहरासह इतर गावात सुद्धा दारू पुरविल्या जाते. यामुळे परिसरातील अनेक गावे त्रस्त झाले आहेत. दरम्यान चांदाळा येथील विक्रेत्यांनी कुंभी शेतशिवारात दारू गाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहफूलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या शेतशिवार व जंगलपरिसरात शोधमोहीम राबवत दारूअड्डे उध्वस्त केले. तसेच दोन ड्रम मोहफुलाचा सडवा, दारू गाळण्याचे साहित्य, रिकामे ड्रम व २० लिटर दारू असा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी दोन दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गडचिरोलीचे ठाणेदार अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार शिवदास दुर्गे यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर व उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.