कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

697

– अनैतिक संबंधातून हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे

The गडविश्व
वर्धा : जिल्ह्यातील अल्लीपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मनसावळी गावात पुष्पा किन्नाके हिच्या घरी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतकाचे ओळख पटली असून वैभव अरुण खडसे (३०), रा. यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. तसेच अनैतिक संबंधातून वैभव याची हत्या करण्यात आली असावी असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे.
दारू विक्रेता पुष्पा किन्नाके हिच्या कुलूपबंद घरातून दुर्गंधी येत होती दरम्यान परिसरातील नागरिकांनी अल्लीपूर पोलिसांना याची माहिती दिली.
माहिती मिळताच पाेलिसांनी मनसावळी गाठून पुष्पा किन्नाके हिच्या घराची पाहणी केली असता तेथे अज्ञात व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्यावर नातेवाइकांकडून मृताची ओळख पटली. पुष्पा हिच्या घरी नेहमी येणाऱ्या वैभव खडसे याचा हा मृतदेह असल्याचे लक्षात येताच अल्लीपूर पोलिसांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. या प्रकरणी काही व्यक्तींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे मृत वैभव खडसे याच्याविरुद्ध चाेरीचा गुन्हा दाखल आहे. त्याने पुष्पा किन्नाके हिच्याच घरी चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर होता. याप्रकरणी पोलिसांनी वैभवला अटकही केली होती. तर आता वैभवचा मृतदेहच पुष्पाच्या घरी सापडल्याने आणि त्याची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली असल्याने हे प्रकरण पुढे कुठले नवीन वळण घेते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मृतक वैभव हा अविवाहित असून, दारू विक्रेता पुष्पा आणि वैभव यांच्यात चांगलीच जवळीक होती. वैभव हा नेहमीच पुष्पा हिच्या मनसावळी येथील घरी येत असे. शनिवारी वैभव याने त्याच्या एका मित्राला मनसावळी येथे सोडले. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पुष्पा हिच्या घरीच सापडल्याची माहिती वैभवच्या नातेवाइकांनी दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वैभवच्या कुटुंबीयांची आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here