– शिक्षिकेच्या कर्तव्यदक्षापणामुळे सर्वच स्तरातून कौतुक
The गडविश्व
गडचिरोली : कोरोना काळात शाळा महाविद्यालय अनेक दिवस बंद होते. मात्र आता कारोनाचा प्रभाव कमी झाल्याने बऱ्याच शाळा महाविद्यालये सुरू झाले आहे. अशातच अनेक विद्यार्थी काही कारणांमुळे शिक्षणापासून वंचीत राहात आहेत. मात्र असेच काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये म्हणून पोर्ला येथील शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका स्मृती रविंद्र कुडकावार यांनी आपली कर्तव्यदक्षता दाखवत विद्यार्थ्यांना आपल्या दुचाकीवर बसवून शाळेत ने-आण करत करीत आहेत. त्यामुळे विद्यार्थी शाळेत येत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक सुध्दा केल्या जात आहे.
शिक्षिका स्मृती रविंद्र कुडकावार ह्या पोर्ला येथील शाळेत शिक्षिका आहेत. दररोज गडचिरोली येथून त्या पोर्ला येथे ये-जा करतात. गडचिरोली पासून ८ किमी अंतरावर असलेल्या साखरा येथील वीटभट्टीवर पोर्ला येथील काही कामगार आपल्या पाल्यांना सोबत घेवून निवासी राहुन विटा बनविण्याचे काम करित आहेत. केवळ मुलांच्या शाळेसाठी घरी राहणे शक्य नसल्याने त्यांनी आपल्या मुलांना सुध्दा विटभट्टीवर आणली. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वचित राहत होती. तुलाराम राऊत यांचा लहान मुलगा प्रथमेश हा पहिल्या वर्गात तर मुलगी स्नेहा ही तिसऱ्या वर्गात पोर्ला येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहेत. काही दिवस मुले शाळेत आली नाहीत याचे कारण लक्षात आले असता शिक्षिका स्मृती रविंद्र कुडकावार यांनी मुलांना विटभट्टीपासून शाळेत ने-आण करण्याची जबाबदारीच स्विकारली. शाळेत जातांना विद्यार्थ्यांना शिक्षिका कुडकावार हया स्वत: च्या दुचाकीवर घेवून जातात व शाळा सुटल्यावर पुन्हा विटभट्टीवर सोडून देतात. हा त्यांचा नित्यक्रम. विद्यार्थ्यांचा शाळेत ये-जा करण्याचा प्रश्न मिटल्याने दोन्ही विद्यार्थी नियमित शाळेत जात आहेत. तर शिक्षिकेसोबत शाळेत जात असल्यापासून मुलेही जबाबदारीने अभ्यास करीत असल्याची माहिती आहे.
शिक्षिका कुडकावार यांच्या कर्तव्यदक्षतामुळे विद्यार्थ्यांची शाळा वाचली आहे. अनेक मुले कामाच्या ठिकाणी आपल्या पालकांसोबत राहत असतात. तर अनेक शिक्षक शाळेत ये जा करतात त्यांनी सुध्दा अशा विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण केली तर अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचीत राहणार नाहीत सोबतच विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांप्रती असलेली भिती दुर होईल. शिक्षिका कुडकावार यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहेत तर इतरही शिक्षकांना शिक्षिका कुडकावार यांचा उपक्रम प्रेरणादायी ठरणारा आहे.