The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यात नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत १४ मे रोजी एका इसमाची हत्या केल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलीस मदत केंद्रा अंतर्गत येत असलेल्या मेंढरी येथून उघडकीस आली आहे. रामजी तिम्मा (४०) असे मृतकाचे नाव आहे.नक्षल्यांनी तिम्मा यांची हत्या करून मृतदेहाजवळ पत्रक टाकले आहे. पत्रकात सदर मृतक आत्मसमर्पित नक्षल असून पोलिसांचा खबरी असल्याचा संशय व्यक्त केला आहे. तर मागील घटनेत एका कमांडरला मारण्यात मृतकाचा हात असल्याचा उल्लेख त्या पत्रकात करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोका पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करून कुटुंबास सुपूर्द केले आहे.
एकीकडे शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत झालेल्या माओवाद्यांचा खात्मा तसेच हिंसाचारेच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. नुकताच १२ मे रोजी नक्षली दाम्पत्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. यात छत्तीगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील वक्कुर येथील कोलू उर्फ विकास उर्फ सुकांत विनोद पदा (२७) व गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जवेली येथील राजे उर्फ डेबो जैराम उसेंडी अशी नावे आहेत. तर दुसरीकडे मात्र नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढत एटापल्ली तालुक्यात इसमाची हत्या करून हिंसक कारवाई घडवून आणली आहे. या घटनेमुळे पुन्हा नक्षली सक्रिय असल्याचे दिसून येत आहे.