गडचिरोली पोलीस दल आयोजित पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पहिले ‘भव्य गडचिरोली महोत्सव’ उत्साहात संपन्न

528

– विजेत्या संघाचा मान्यवरांकडुन सत्कार
– बचत गट व स्वयंसहायत गटांना मिळाली भव्य बाजारपेठ, विविध स्टॉलमधुन १४ लाखांच्यावर वस्तुंची विक्री
The गडविश्व
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हयात पहील्यांदाच भव्य गडचिरोली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव जिल्हा परिषद कार्यालयाच्या भव्य मैदानावर १ ते २ मार्च २०२२ दरम्यान पार पडला. या महोत्सवाचा समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम २ मार्च रोजी पार पडला.
गडचिरोली पोलीस दलाने आयोजित केलेल्या व दोन दिवसापासून चाललेल्या या गडचिरोली महोत्सवाचे विशेष आकर्षण बिरसा मुंडा व्हॉलीबॉल स्पर्धा व आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा तसेच हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाच्या पहील्या दिवशी ०१ मार्च रोजी महोत्सवाचे उद्घाटन नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा ना. एकनाथजी शिंदे यांचे हस्ते, पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील सा., गडचिरोली परिक्षेत्र नागपूर यांचे उपस्थितीत पार पडले. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गडचिरोली जिल्हयाच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील व्हॉलीबालचे १० संघ उपस्थित होते. या संघांमध्ये अत्यंत रोमहर्षक सामने पहावयास मिळाले. या व्हॉलीबॉल स्पर्धेमधून ०३ विजेत्या संघांची निवड करण्यात आली. प्रथम क्रमांक विजेते असरअल्ली व्हॉलीबॉल सिरोंचा या संघास २५ हजार रुपये रोख, ट्राफी व गोल्ड मेडल, व्दितिय क्रमांकाचे विजेते आरडी क्लब अहेरी यांना २० हजार रुपये रोख, ट्राफी, सिल्व्हर मेडल, व तृतिय क्रमांकाचे विजेते जय बजरंग क्लब एटापल्ली यांना १५ हजार रुपये रोख, ट्राफी व ब्राँझ मेडल देवून सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट ऑलराऊंडर म्हणुन कामगिरी करणाऱ्या तरुण राघवसु गावडे, उत्कृष्ट स्नॅशर म्हणुन अंजी कनयक्का पेद्दी व उत्कृष्ट लिफटर म्हणुन निसार शेख यांना चषक, ट्रॅकसुट व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. तसेच महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २ मार्च रोजी आदिवासी रेला समुह नृत्य स्पर्धा पार पडल्या. त्यातुन आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन उपस्थितांना पहावयास मिळाले. या रेला नृत्य स्पर्धेत जिल्हयातुन १० संघ सहभागी झाले होते. त्यापैकी उत्कृष्ट पहील्या तीन विजेत्यांची निवड करण्यात आली प्रथम विजेत्या जय सेवा रेला संघ झिगानुर यास २५ हजार रुपये रोख, ट्राफी व प्रमाणपत्र, व्दितिय क्रमांकाच्या अनुप डॉन्स रेला संघ घोट यास २० हजार रुपये रोख, ट्राफी व प्रमाणपत्र, आदिवासी रेला नृत्य संघ धानोरा यास १५ हजार रुपये रोख, ट्राफी व प्रमाणपत्र व इतर सहभागी संघांना उत्तेजनार्थ प्रत्येकी ५००० हजार रुपये रोख देवून गौरविण्यात आले. गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागातुन आलेल्या आदिवासी पारंपारिक रेला नृत्यासोबतच राजमुद्रा ग्रुपच्या कलावंतानी विविध नृत्य सादर करुन प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.
महोत्सवातील दोन्ही दिवस गडचिरोली जिल्हयातील विविध ५० बचत गट व संस्थांनी आपल्या उत्पादनाचे व विविध वस्तुंचे स्टॉल लावलेले होते. यामध्ये नवजीवन उत्पादक संघ, नवेगाव गडचिरोली, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, एम्स अकॅडमी बुक स्टॉल गडचिरोली सोबतच मौजा किटाळी, वासाळा, पुराडा, कोटमी, भामरागड, अहेरी येथुन बांबु, माती व लाकडापासुन निर्मीत हस्तकलेच्या वस्तु, ऑर्गनिक उत्पादने तांदुळ, हळद, पालेभाज्या, अंबाडी सरबत, मोहफुलापासून तयार केलेले लाडु बिस्किट, जॉम, मस्य लोणचे, जांभुळ निर्मीत विविध उत्पादने तसेच इतर वस्तु विक्रीकरीता लावण्यात आले होते. बचत गट व स्वयंसहायता गटांच्या विविध हस्तकलेच्या वस्तूंच्या स्टॉलमधून १४ लाखाच्यावर उपस्थित नागरीकांनी खरेदी केली. या महोत्सवाच्या माध्यमातून बचत गट व संस्थांना मोठी बाजारपेठ मिळाली.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रम पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा, मुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोली कुमार आशिर्वाद, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख मा, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे सा, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोलाचे अधिष्ठाता कडु सा., उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड गणापुरे, कृषी विज्ञान केंद्र (आत्मा) गडचिरोली श्री. संदिप कन्हाडे यांच्या हस्ते पार पडले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व अंमलदार यांनी अथक परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here