– एकूण २२५५ पोलिओ लसीकरण बुथ, ४९६४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
The गडविश्व
गडचिरोली : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 27 फेब्रुवारीला राबविण्यात येणार असून ग्रामीण भागात 75352 तर शहरी भागात 8021 बालकांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणाचा वयोगट शुन्य ते पाच वर्षाचा असून या वयोगटातील बालकांना पोलिओ डोस दि.27 फेब्रुवारी रोजी देण्यात येणार आहे. ग्रामीण भाग 2159 व शहरी भाग 96 असे मिळून एकूण 2255 लसीकरण बुथ असून या मोहिमेसाठी 4 हजार 964 अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.एस.साळवे यांनी दिली. यावेळी डॉ.सुनिल मडावी, डॉ.विनोद मशाखेत्री, डॉ. पंकज हेमके व डॉ.समीर बनसोडे उपस्थित होते.
लसीकरण मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, नगरपालिका दवाखाने, येथील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरावर एक दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे. गावपातळीवर आरोग्य सेवक, सेविका आशा स्वयंसेविका या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. मुबलक लससाठा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध आहे. यात शहरी भागासाठी 8021, ग्रामीण भागासाठी 117504 अशा एकूण 125525 लशीच्या मात्रा जिल्हयासाठी प्राप्त आहेत.
27 फेब्रुवारीला होणाऱ्या लसीकरण मोहिमेतून ग्रामीण भागात सुटलेल्या बालकांना 28 फेब्रुवारीपासून 3 दिवस व शहरी भागात सलग 5 दिवस घरोघरी जावून पोलिओ लस पाजण्यात येणार आहे. पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यात 131 ट्रांझिट टिमद्वारे बस स्टँड, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी, यासोबतच 95 मोबाईल टिमद्वारे कामगार, भटके लोक, रस्त्यावरील मजुरी करणाऱ्यांची मुले यांना पोलिओचे डोस पाजण्यात येणार आहेत. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लसीकरणासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन सर्व बुथवर व आयपीपीआय मोहीम राबवितांना करण्यात येणार आहे. शुन्य ते पाच वर्ष वयाच्या बालकांना यापूर्वी पोलिओ डोस दिला असला तरी या मोहिमेमध्ये पोलिओ लसीकरण करुन घ्यावे व मोहीम शंभरटक्के यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा आरोगय अधिकारी डॉ.डी.एस.साळवे यांनी केले आहे.
यापुर्वीची आकडेवारी : यापुर्वी जिल्हयात 10 मार्च 2019, 19 जानेवारी 2020 व 31 जानेवारी 2021 रोली पल्स पोलिओ लसिकरण मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये अनुक्रमे 99.14 टक्के, 97.42 टक्के आणि 94.94 टक्के झाले होते.