– लिलाव प्रक्रियेत जास्तीत जास्त स्पर्धकांना सहभागी होण्याचे आवाहन
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त 28 रेती घाटाच्या लिलावासाठी जिल्हा प्रशासनातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. लिलावामध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांना नोंदणी प्रक्रिया, ऑनलाइन पद्धतीने रेती घाट लिलाव प्रक्रियाबाबत 6 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशिक्षण देण्यात आले. उक्त 28 रेती घाटाचा लिलावाद्वारे जिल्ह्यात 4 लक्ष 30 हजार 380 ब्रास रेती विकास कामांकरीता उपलब्ध होणार आहे. या रेती घाटाच्या लिलावाद्वारे निश्चित केलेल्या किंमतीनुसार जिल्हा प्रशासनास 45.11 कोटी रुपये इतका महसूल प्राप्त होणार आहे. तरी, या लिलाव प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी केले आहे.
असे असणार लिलावाचे वेळापत्रक:
दि.5 जानेवारी 2022 रोजी लिलावाची संगणकीय नोंदणी (ऑनलाइन रजिस्ट्रेशन) सुरु, दि. 11 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता संगणकीय नोंदणी (ऑनलाइन रजिस्ट्रेशन) पद्धत बंद होईल. 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजतापासून ई-निविदा ऑनलाईन पद्धतीने जमा करणे सुरू होईल. 18 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता ई-निविदा ऑनलाइन पद्धतीने स्वीकारणे बंद होईल. तर 19 जानेवारी रोजी ई-लिलाव प्रक्रिया सकाळी 10 वाजता पासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. त्यानंतर लिलाव बोली उघडण्यात येतील व लगेच ई-निविदा उघडण्यात येतील.
या लिलाव प्रक्रियेमध्ये तांत्रिक तसेच कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास जिल्हा खनिकर्म शाखेशी संपर्क साधावा, असे जिल्हा खनिकर्म कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.