-एटापल्ली तालुक्यातील ४७६ महिला-पुरुषांचा सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑक्टोबर : अवैध दारूविक्रीविरोधात लढा उभारण्याकरिता गावाची एकी दाखविण्यासाठी गाव संघटेनच्या माध्यमातून मुक्तिपथ मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या विविध गावात आयोजित स्पर्धेच्या माध्यमातून एकूण ४७६ महिला-पुरुषांनी गाव दारूमुक्त करण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी दर्शविली आहे.
पंदेवाही येथील स्पर्धेत ४३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेची सुरुवात दारूमुक्तीची मशाल उपसरपंच बाळू आत्राम, पोलिस पाटील वळू आत्राम, गाव संघटनेच्या महिला अध्यक्षा ललिता चंदनखेडे यांच्याहस्ते पेटवून करण्यात आली. युवगटातून प्रथम क्रमांक नानेश गावडे, द्वितीय क्रमांक रवींद्र आत्राम, युवतीगटात प्रथम ज्योती आत्राम, द्वितीय माधुरी आत्राम यांनी पटकाविला तर प्रौढ गटात प्रथम रंजित पोदाळे, द्वितीय तुळशीराम तलांडे तर महिला गटात प्रथम सुशिला आत्राम व द्वितीय क्रमांक चिनीबाई आत्राम यांनी पटकाविले. तोडसा येथे मॅराथॉन स्पर्धा सरपंच प्रशांत आत्राम यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. यावेळी पोलिस पाटील रैजी गावडे व गाव संघटनेचे सदस्य उपस्थित होते. गावातील ५५ जणांनी या स्पर्धेत सहभाग दर्शविला होता.
एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही, तोडसासह डोड्डी येथील स्पर्धेत ७४, चंदनवेली ३५, डुम्मे ५७, ताटिगुड्डम ५४, जांभिया ५४, तांबडा ४३, पैमा २७ व एकारा गावात आयोजित मॅराथॉन स्पर्धेत ३४ स्पर्धक उतरले होते. अशा एकूण ४७६ महिला-पुरुष, युवक-युवतींनी दारूबंदीची मशाल पेटवून स्पर्धेतून अवैध दारूविक्रीला विरोध दर्शविला. त्यानंतर स्पर्धेचे रूपांतर सभेत करून ग्रामस्थांना दारूबंदीचे महत्व, गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच मॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या स्पर्धकांना सर्चचे संचालक डॉ. अभय बंग व जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र, मेडल देऊन गौरविण्यात आले. या मॅरेथॉन कार्यक्रमांचे नियोजन तालुका संघटक किशोर मलेवार, स्पार्क कार्यकर्ती रुणाली कुमोटी यांनी केले.