– गोपाल दिघोरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
The गडविश्व
देसाईगंज : तालुक्याच्या विविध नदी घाटातुन बेकायदेशीर रेती व मुरुम या गौण खनिजाचे उत्खनन करुन सर्रास वाहतूक व पुरवठा करणाऱ्या संबंधित तस्करांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी गोपाल दिघोरे यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना यांना दिलेल्या निवेदनातुन केली असल्याने गौण खनिज तस्करांत एकच खळबळ माजली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की देसाईगंज तालुक्यात आजमितीस मोठ्या प्रमाणात शासकीय व निमशासकिय बांधकामे सुरु आहेत. तालुक्यातील नदी घाटांचे अद्यापही लिलाव झाले नसताना महसूल विभागाने घाट रस्त्यावर पाडलेले खड्डे बुजवुन राञं दिवस बेकायदेशीर गौण खनिजाचे उत्खनन करुन सर्रास पुरवठा करण्यात येत आहे.
यामुळे शासनाच्या कोट्यावधी महसुलावर पाणी फेरल्या जात असुन सर्व सामान्य गोरगरीबांना अव्वाच्या सव्वा दराने रेती, मुरुम गौण खनिजाचा पुरवठा करुन सर्रास लुट केल्या जात आहेत.रेती व मुरुम तस्करी करताना संबंधित तस्कर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर पाळत ठेवण्यासाठी म्होरक्यांचा वापर करीत असल्याने सदर गौण खनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करताना पकडल्या जात नाही.
यामुळे सदर तस्करांची दिवसेंदिवस हिम्मत वाढतच चालली असुन यामुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यास्तव शासकीय व निमशासकिय बांधकामावर पुरवठा केल्या जात असलेल्या गौण खनिजाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागुन आहे.