नक्षल्यांनी केली ग्रामीण व्यावसायिकाची हत्या

1849
File Photo

– वाहनाचीही केली जाळपोळ ,पत्नी व मुलासमोरच व्यावसायिकाला बेदम मारहाण

The गडविश्व
सुकमा, २२ जुलै : जिल्ह्यातील पोलमपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलमपल्ली येथील व्यावसायिकाची नक्षल्यांनी गुरुवार २१ जुलै रोजी मध्यरात्री हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मडकम जोगा असे हत्या करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. हत्येनंतर नक्षल्यांनी व्यावसायिकाची चारचाकी वाहन पेटवून दिले व पत्रकही टाकले आहे. पोल्लमपल्ली येथील रहिवासी मडकम जोगा हे गावातच किराणा दुकान चालवायचे. गुरुवारी रात्रो उशिरा मडकम हे कुटुंबासह घरी झोपले असताना त्याच वेळी सुमारे १५-१६ नक्षली घरात घुसले. यावेळी नक्षल्यांनी त्याचे पत्नी आणि मुलाला धरून ठेवले व त्यानंतर मडकम यांना काठीने बेदम मारहाण केली. पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करत बेदम मारहाण केल्याने मडकम चा मृत्यू झाला. हत्येनंतर नक्षल्यांनी घरसमोर असलेल्या पिकअप वाहनाची डिझेल टाकी फोडून ती पेटवून दिली.दरम्यान नक्षल्यांनी गावात पत्रकेही टाकली आहेत. पत्रकात नक्षल्यांनी व्यावसायिकाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या पोलीस कुटुंबीयांची चौकशी करत आहेत. सुकमाचे एसपी सुनील शर्मा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही नक्षली घटना आहे की परस्पर वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे, हे तपासानंतरच समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here