नरजन्माची प्राप्ती: साधा मोक्ष मुक्ती !

303

प्रत्येक धर्मातील धार्मिक माणूस आपल्या पुजास्थळी जातो. काही मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, विहार, अग्यारी, प्रार्थनामंदिर अशी ती अनेक स्थळे आहेत. तेथे तो आपल्या आराध्य दैवताची पूजा-अर्चा, इबादत, बुलावा, धावा, भजन, प्रार्थना, वर्शिप आदी करतो. हे तो का करतो? आपल्याला ईश्वरप्राप्ती व्हावी व शाश्वत सुख लाभावे, म्हणून तो हे कृत्य करतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात म्हटले आहे-

“रूप पाहता लोचनी। सुख जाले वो साजनी।।
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा।।
पुण्याची गणना कोण करी।।”
या संतवचनास अनुसरून तो याच कृत्यांना देवपूजा, ईश्वरोपासना अर्थात भग्वदभक्ती समजतो. त्याला खरे तर शाश्वत सुखाचाच अर्थ उमगलेला नसतो. तो हे सुख धन, संपत्ती, संतती, शरीरस्वास्थ, ऐशो-आराम, दीर्घायुष्य, मृत्यू न येणे, दुःखाची चाहूलही न लागणे आदी गोष्टींतच शोधत असतो. संतांच्या मते हे काही शाश्वत सुख नव्हे. या गोष्टींची आस ही भौतिक आणि क्षणिक सुखांची लालसा होय. जन्म-मृत्यूच्या चक्रीवातातून, चौऱ्यांशी लक्ष जन्मयोनीतून सुटका होणे, हे खरे शाश्वत सुख आहे. त्यालाच मोक्ष व मुक्ती म्हटले जाते. ज्या कृतीने मोक्ष व मुक्ती अर्थात अमरपद प्राप्त होते, ती कृती म्हणजेच खरी भग्वदभक्ती असते. अन्यथा उपड्या घड्यावर पाणी ओतून मी घडा भरत आहे, असे छाती ठोकून सांगण्यासारखे आहे.
शाश्वत सुख मिळवून देणारी भक्ती आपल्या मन-मर्जीने करता येत नाही. ती मोक्षदाता सद्गुरू प्रणित असावी लागते. असा सद्गुरू प्रत्येक युगात अवतरत असतो. तो जगात सर्वसामान्य माणसासारखाच वावरत असतो. तो ‘मी ईश्वराचा अवतार आहे. इच्छित वस्तू तुम्हाला मिळवून देतो. मृत्यूपासून तुमची सुटका करून देतो. या, चमत्कार बघा.” अशा पोकळ बाता व थापा कधीच मारत नाही. यासाठीच जगद्गुरू संत तुकाराम महाराज जागवितात-
“जाणारे जाणा, देवाला जाणा!
जाणारे करा कल्याण!
ऐसे वदती वेद पुराण!!”
कारण खरा परमेश्वर- परमात्मा तो हा निर्गुण-निराकार असून तो असा सद्गुरूच्या सगुण-साकार रुपात आपल्यात वावरत असतो. या जगी तो आजही आहे; त्याचा शोध घेतल्यास, पारख केल्यास कळून येईल. भगवान श्रीकृष्ण अवतरले, तेव्हा त्यांनी स्वतः ईश्वर असल्याचे कोणालाच सांगितले नाही. सगुण-साकार रुपात प्रकट होऊन भगवंताने सर्वसामान्य माणसाप्रमाणे व्यवहार केले. जगतकल्याणाची कार्ये केलीत. ब्रह्मज्ञानाची इच्छा, परमपित्याचे विश्वरूप दर्शन करण्यासाठी महावीर अर्जुन श्रीचरणी नतमस्तक झाला. तेव्हा ते भग्वदगीता या पावण ग्रंथाएवढे ज्ञान आध्यात्मिक सद्गुरू श्रीकृष्णाने डोळ्याची पापणी लवत नाही एवढ्या वेळात- क्षणार्धात ब्रह्मदर्शनासह ब्रह्मबोध केला होता. काही लोकांना योगायोगाने अशा सद्गुरूची भेट झाली, तरी ते त्याच्या करवी ब्रह्मबोध घेऊन खऱ्या भक्तीचा श्रीगणेशा करण्यास धजत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कारण त्यांना वाटते, की आतापासून कशाला टाळ कुटायचे? भक्ती तर म्हातरपणीचा विषय आहे. मला सांगा, भक्ती ही वृक्षवेली, पशुपक्षी आणि किडामुंगी आदी जन्मांत होते का हो? नाही होत. म्हणून संपूर्ण मानवजन्मच भक्ती करून मुक्ती मिळविण्याची सुवर्ण संधी असते. मग ती म्हातारपणीच कशी काय सफलपूर्ण होऊ शकेल? शक्यच नाही. काही जण तर त्यापूर्वीच गचकतात आणि सर्वात महत्वाची गोष्ट- भक्ती करावयाची राहूनच जाते. मग गेला ना नरजन्म वाया? ग्रंथकार भर्तृहरिने लिहिले-
“भोगा न भुक्ता वयमेव भुक्ता:|
तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा:||”
अर्थ- आपण भोगांना नाही तर भोगांनीच आपल्याला उपभोगले, तसेच आमची तृष्णा जीर्ण झाली नाही तर आम्ही वयानेच जीर्ण झालो. आम्ही कामनांना रोखल्याशिवाय मोक्ष फार दूरची गोष्ट होईल.
आपण ज्याचे भजन, पूजन, नामोच्चार, कीर्तन, नामस्मरण आदी करतो, त्याचे रूप नको का बघायला? तो देव पाहिलो, ओळखलो, विश्वास ठेवलो आणि त्याचा ठावठिकाणा माहित केलो तरच आपली भक्ती यशस्वी ठरेल. जसे की पवित्र बायबल ग्रंथ ग्वाही देतो-
“नो द गॉड यी वर्शिप!”
जगात देव एक आहे, की अनेक आहेत, याचे ज्ञान झाले तर माणसांमाणसांतील भेदभाव नष्ट होऊन धर्म, जाती, लिंग, वर्ण यातील भ्रमभ्रांती दूर होईल. तो एकमेकांशी बंधुभावाने, गुण्यागोविंदाने नांदू शकेल. यासाठी भगवंताने कालावधी निश्चित करून दिलेला आहे, तो म्हणजे मानवजन्म. माणसाने जीवन असेपर्यंत सांप्रत सद्गुरूकडून देवाला पाहूनच भक्ती करावी व नरजन्माचे मोल वाढवावे. आपला-परका भेदभाव न ठेवता अंतीम समयी आत्मा परमात्म्याशी एकरुप आणि एकजीव करून घ्यावा. जसे की एका शायरने उद्बोधक रचना केलीय-
“किसको पत्थर मारे; कौन पराया है?
शिस महल में हरेक चेहरा अपना लगता है!”
बघ्यांच्या गर्दीत आपल्या लाडक्यांना समोरचे दृश्य दिसावे, म्हणून मायबापांनी त्यांना खांद्या-कडेवर उचलून धरले होते. आपण त्यांना याबद्दल विचारले तर ते सांगतात, की त्यांनी जे पाहिले नाही ते त्यांच्या अपत्यांनी पहावे. म्हणून त्यांची ती धडपड होती. विद्यमान सद्गुरूचीही अशीच महत्त्वाकांक्षा आणि तळमळ दिसून येत असते, म्हणूनच त्यास आईची उपमा देतात, सद्गुरू माऊली संबोधतात. मायबापांनी खाली उतरवून ठेवले तर ती मुले म्हणतात, की त्यांना काय ते बरोबर दिसले नाही. पुन्हा उचलून घ्यावे. गाडी बसस्थानकावर आलेली बघून ते तिकडे धावतात. त्यामुळे मुलांना ते दृश्य परत कधीच बघता येत नाही. कारण ती एक चांगली वेळ- सुवर्ण संधी असते. ती एकदा चुकली-हुकली तर पुन्हा कधी येईल, हे सांगता येत नाही. अगदी तसेच नरजन्माचे असते, ईशोपासना करण्याची, ईश्वरदर्शन करण्याची वेळ निघून गेली तर मनुष्य पुन्हा चौऱ्यांशीच्या फेऱ्यात पडतो. जंतू, किडा, मुंगी, डुक्कर, गाढव, वृक्ष, वेली, गिधाड, चिमणी, गाय, अशा अनेक जन्म-मरणाच्या कचाट्यात सांपडतो. संत शिरोमणी अवतारसिंहजी महाराज म्हणतात- सम्पूर्ण अवतार बाणी: पद- ७८-
“बिन देखे यह मन नही माने बिन मन माने प्यार नही।
प्यार बिना न भक्ति हो बिन भक्ति नैया पार नही।”
म्हणून माणसाने परमार्थाची व सन्मार्गाची तातडी केलेलीच बरी! कारण मनुष्यजन्म पुनः पुन्हा नाहीच!

– संत चरणधूळ –
श्री कृष्णकुमार गो. निकोडे गुरुजी.
(सुप्रसिद्ध आध्यात्मिक विचारवंत)
गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here