The गडविश्व
नागपूर : सरोगसी माता देण्याची बतावणी करून ७ लाख रुपयात नवजात कन्येची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी डॉक्टरसह तिघांना अटक केली आहे. डॉ. विलास दामोदर भोयर (३८), गुमथळा, कामठी, राहुल ऊर्फ मोरेश्वर दाजिबा निमजे (३२) श्रीकृष्णनगर, वाठोडा आणि नरेश ऊर्फ ज्ञानेश्वर राऊत (४८) मुदलियार चौक, शांतीनगर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .
डॉ. भोयर आयुर्वेदिक आहेत, तर राहुल निमजे त्यांचा इतर काम पाहत असे. दोघेही अनेक दिवसांपासून नवजात बाळांची खरेदी-विक्री करीत असल्याची शंका होती. हैदराबाद येथील एका दाम्पत्याला अनेक दिवसांपासून अपत्य नव्हते. ते सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे सुख मिळवू इच्छित होते. मध्यमवर्गीय असल्यामुळे ते सरोगसीसाठी खूप रक्कम खर्च करण्याच्या स्थितीत नव्हते. दरम्यान, हे दाम्पत्य राहुल तसेच डॉ. भोयर यांच्या संपर्कात आले. डॉ. भोयर यांनी सरोगसीतून संतान सुख देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी या दाम्पत्याला त्यांचा कथित उपचार सुरू केल्याची बतावणी केली. त्याने पतीचे शुक्राणूही मिळविले. दरम्यान, निमजे नवजात बाळाची विक्री करणाऱ्या इच्छुक दाम्पत्याचा शोध घेऊ लागला. डॉ. भोयरच्या संपर्कात एक गरीब महिला आली. अनैतिक संबंधातून महिला बाळाला जन्म देऊ इच्छित नव्हती. तिने डॉ. भोयरला गर्भपात करण्यास सांगितले. नवजात बाळ हवे असल्यामुळे डॉ. भोयरने तिला गर्भपात न करण्यासाठी तयार केले. त्याने प्रसूतीनंतर पैसे देण्याचे आमिष या महिलेस दाखविले. महिला नरेश राऊतच्या ओळखीची आहे. त्याने महिलेला प्रसूतीसाठी तयार केले. २८ जानेवारीला महिलेने मुलीला जन्म दिला. त्यानंतर बनावट कागदपत्र तयार करून नवजात मुलीची सात लाखात हैदराबादच्या दाम्पत्याला विक्री केली. एका तक्रारीतून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना ही माहिती समजली. त्यांनी गुन्हे शाखेला तपास करण्याचे निर्देश दिले. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रेखा संकपाळ यांनी तपास केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.
अपत्यहीन दाम्पत्य अनेकदा अशा फसवणुकीचे शिकार होतात. हा त्यांच्यासोबत क्रूरपणाने वागण्यासारखा प्रकार आहे. वेळोवेळी नवजात बाळांच्या विक्रीची प्रकरण समोर येतात. या प्रकरणातील आरोपींनीही यापूर्वीही अशीच फसवणूक केली असावी, अशी शंका आहे. पोलीस या घटनेचा बारकाईने तपास करीत आहेत.