पातानील येथील हत्तीचे स्थलांतरण करण्यापेक्षा एलिफंट पार्क उभारा

332

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील कामलापूर तसेच पातानील येथील हत्ती गुजरात ला हलविल्या जाणार आहे. सदर हत्तीचे स्थलांतरण करण्यापेक्षा त्याठिकाणी एलिफंट पार्क उभारा अशी मागणी टायगर ग्रुप टायगर युथ बहुउद्देशीय विकास स्वयंसेवी संस्था गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारदृष्ट्या अहेरी तालुका सर्वाधिक विकसित भाग आहे. या तालुक्यातील आलापल्ली या गावापासून ४ किमी अंतरावर पातानील गणेश मंदिर आहे.
आलापल्ली भागातील सागवान हे जगातील उत्तम दर्जाचे सागवान समजले जाते. १९८० च्या दशकात हे सागवान लाकूड व्यावसायिक पद्धतीने तोडणी व विक्री करण्यासाठी मुलभूत वाहक म्हणून हत्तींचा वापर केला जात होता. १९८१ साली या भागात वन विभागाच्या अखत्यारीत ४ हत्ती होते. कापलेले सागवान जंगलाबाहेर आणण्याच्या रोजच्या कामावर हत्ती नेमले असताना यातील एक हत्ती जंगलात बेपत्ता झाला. २ दिवस उलटूनही या किर्र जंगलात त्याचा काही पत्ता लागेना. शेवटी वन विभागाच्या शोध मोहिमेतील कर्मचारी व मजुरांनी बाप्पाच्या चरणी साकडे घातले. ” हत्ती सापडू दे, ११ पोती नारळ फोडू ” आणि काय आश्चर्य काही क्षणातच हरविलेल्या हत्तीची किंकाळी मजुरांच्या कानी आली. मजुरांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा लक्षात आले की हत्तीच्या गळ्यातील साखळदंड एका दगडाला अडकले आहेत. ते काही केल्या निघेनात. शेवटी जोर लावून हा दगड बाहेर काढला गेला. बघतात तर काय चक्क या दगडाला श्री गणेशाचे रुपडे होते. या पद्धतीने वन विभागावरील संकट गणरायानेच दूर केले, म्हणून वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी व मजुरांनी एकत्र येत ही मूर्ती साफ करून तिची प्राणप्रतिष्ठा केली.
हा सर्व प्रकार एखाद्या चमत्कारापेक्षा काही कमी नव्हता. आता पातानीलचा गणपती हा नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध पावला आणि ते हत्ती सुद्धा तिथेच राहू लागले. आलापल्ली येथे कोणताही सण असो आधी त्या ३ हत्तींचे दर्शन व पूजा मगच सण साजरी करतात. पातानिल येथील हत्ती कधीच गावकऱ्यांवर हिंसक झाले नाही . मात्र आता शासन त्या तीनही हत्तींना गुजरात येथील खाजगी प्राणी संग्रहालयात हलविणार आहे. हत्तींना इतर राज्यात हलविण्यापेक्षा एक मिनी एलिफंट पार्क पातानील येथे उभारा अशी मागणी टायगर ग्रुप टायगर्स यूथ बहुद्देशिय विकास स्वयंसेवी संस्था गडचिरोली जिल्हा ने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here