– तेलगू भाषेतून जनजागृती
The गडविश्व
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील प्राणहिता नदीवर सुरू झालेला पुष्कर मेळा दारू व तंबाखू मुक्त करण्यासाठी तालुका प्रशासन व मुक्तीपथ संयुक्तरीत्या प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे जत्रा दारू व तंबाखू मुक्त करण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी 60 स्वयंसेवकांचे 5 पथक तयार करण्यात आले आहे.
सिरोंचा तालुक्यात १२ वर्षातून एकदा पुष्कर जत्रा भरत असते. या जत्रेत महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. काही व्यक्ती द्वारे दारू व तंबाखूच्या सेवनाने स्वच्छतेला व वातावरणात गालबोट लागते. हे टाळून भक्तीपूर्ण वातावरणात हा उत्सव साजरा व्हावा, यात्रेच्या काळात कोणत्याही नशायुक्त पदार्थांचा वापर होऊ नये या हेतूने तालुका प्रशासन व मुक्तीपथने विशेष उपाययोजना केल्या आहेत.
जत्रेच्या पहिल्या दिवशीपासून सी. व्ही. रमन सायन्स कॉलेज व भगवंतराव विद्यालयातील एकूण 60 स्वयंसेवकांची निवड करून त्यांची पाच विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. स्वयंसेवकाच्या या पथकासोबत तैनात पोलीसांद्वारा सुद्धा कारवाई सुरु आहे. हे पथक गर्दीच्या ठिकाणी तैनात असून खर्रा विक्रेत्यांच्या दुकानांची व खर्रा खाऊन येणाऱ्यांची तपासणी करीत आहेत. भाविकांना खर्रा विष आहे हे बिल्ले लावून व व्यसनाचे दुष्परिणाम सांगत जनजागृती करीत आहेत तसेच जत्रेच्या विविध ठिकाणी तेलगू व मराठी भाषेत बॅनर लावून पवित्र तीर्थ क्षेत्रात कोणीही दारू व तंबाखू विक्री करू नये, सेवन करू नये असे आवाहन करण्यात येत आहे. जत्रेचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी तहसीलदार जितेंद्र सिकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका समिती, मुक्तीपथ तालुका चमू व स्वयंसेवक पथक प्रयत्न करीत आहेत.