बापरे ! हृदय विकाराचा झटका ?

291

जागतिक हृदय दिन सप्ताह

आजच्या दिवशी म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी दरवर्षी सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात येतो. आज काल हृदयरोग होणे अथवा त्याचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे, ही बाब एखाद्या विशिष्ट वयानंतर होऊ शकते असे राहिले नाही. विशी-तिशीतल्या उमद्या तरुणांचाही हृदय विकाराच्या झटक्यामुळे निधन झाल्याची उदाहरणे ऐकायला मिळतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल ३२ टक्के मृत्यू हृदय विकारामुळे होतात. त्यामुळे असे दिवस साजरे करून हृदय रोगांविषयी जनजागृती करणे, हृदयरोग होऊ नये अथवा झाल्यास काय उपाययोजना करावी, याची माहिती जनतेपुढे मांडणे किती महत्वाचे ठरते? याबद्दल कृष्णकुमार निकोडे गुरुजी यांचा हा प्रेरणादायी लेख..

हृदय विकारासंबंधित जनजागृती करण्याचा दिवस म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा करतात. या दिवसाला आंतरराष्ट्रीय हृदय दिन असे संबोधतात. या उपक्रमामध्ये हृदय विकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो. विश्व हृदय संघटना आणि विश्व आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सन १९९९मध्ये विश्व हृदय दिवसाला मान्यता मिळाली. विश्व हृदय संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष आंतोनियो लुना यांच्या संकल्पनेतून हा वार्षिक उपक्रम राबवण्यात आला. उपक्रमाच्या सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातील अखेरचा रविवार हा जागतिक हृदय दिन म्हणून ठरवण्यात आला होता. त्यानुसार दि.२४ सप्टेंबर २००० रोजी हा दिवस प्रथमच साजरा केला गेला. त्यानंतर सन २०११पासून २९ सप्टेंबर हा कायमचा जागतिक हृदय दिवस म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

प्रत्येक वर्षी जागतिक हृदय संघटनेद्वारे कार्यक्रमाची रूपरेषा उद्धृत केली जाते. प्रथम वर्षी शारीरिक सक्रियता या रूपरेषेला अनुसरून जनसामान्यांमध्ये माहितीचा प्रसार करण्यात आला. सन २००३मध्ये स्त्री आणि हृदयविकार ही रूपरेषा ठरवण्यात आली. याद्वारे स्त्रियांमध्ये उद्भवणाऱ्या हृदयरोगाची कारणमीमांसा व उपचार यांबाबत माहिती देण्यात आली. सन २००८मध्ये हृदय विकाराची शक्यता याचे मोजमापन करण्याबाबत रूपरेषा आखण्यात आली. याद्वारे व्यक्तिसापेक्ष हृदय विकार होण्याच्या संभावनांचे मूल्यमापन करण्यात आले. इ.स.२०१९मध्ये स्वत:च्या आणि इतरांच्या हृदयाची काळजी घेण्याबाबत माय हार्ट ॲण्ड योर हार्ट ही रूपरेषा योजण्यात आली होती. अशा पद्धतीने संतुलित वजनासह निरोगी हृदयास आवश्यक जीवनशैली तसेच व्यवसायाच्या ठिकाणी हृदय निरोगी राखण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती अशा अनेक महत्त्वपूर्ण रूपारेषांना वाहिलेले कार्यक्रम देखील या दिवसाच्या निमित्ताने आखण्यात येतात.

हृदय विकार बळावण्याचे निश्चित वय सांगता येत नाही. त्याचा कोणत्याही वयात झटका येऊ शकतो. जागतिक आकडेवारीनुसार हृदय विकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. आपण काही डॉक्टर नाही. परंतु मानवतेच्या नात्याने कळवळा येतो, म्हणूनच हा लेखप्रपंच केला आहे. अधिकतर व्यक्ती हृद रोहिणी विकार किंवा हृदय विकाराचा झटका आल्याने मरण पावतात. असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवाप्रदूषण ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे आहेत. हृदय विकारासंबंधित माहिती तसेच प्रतिबंधात्मक उपाय यांबद्दल चर्चा, फलक किंवा माहिती पत्रिका यांद्वारे २९ सप्टेंबर या दिवसापासून आठवडाभर जनजागृती केली जाते. आंतरराष्ट्रीय हृद रोहिणी संशोधन संस्था व वैद्यकीय समूहांद्वारे शास्त्रीय बैठक आणि चर्चा आयोजित केल्या जातात. तसेच जागतिक हृदय ‍दिवसानिमित्त शैक्षणिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरे घेतली जातात. संतुलित आहार, व्यायाम यांद्वारे हृदयविकाराला प्रतिबंध होऊ शकतो, याबाबत माहिती दिली जाते.

हृदयरोग टाळण्यासाठी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा. त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियाही सुरळीत चालते. जास्तीत जास्त पायी चालण्याचा अथवा सायकल चालविण्याचा प्रयत्न करावा. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा तसेच नियमित फलहार घ्यावा. संगीत, बागकाम, वाचन आणि योगसाधनेद्वारे अथवा आपल्याला असणाऱ्या एखाद्या छंदात मन गुंतवून तणावापासून दूर राहावे. इतर कुणापेक्षाही व्यसन करणाऱ्यांना हृदयरोग होण्याची भीती सर्वाधिक असते. त्यासाठी तंबाखू, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहणे कधीही चांगले. त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त खाणे; साखर, मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन करणे तसेच कोणत्याही गोष्टीचा टेन्शन- ताण घेणे या गोष्टी ताबडतोब बंद करणेच श्रेयस्कर ठरतील.

!! The  गडविश्व तर्फे विश्व हृदय दिनानिमित्त सर्वांना जागरूकतेसंबंधी आठवडाभर हार्दिक शुभेच्छा !!

मानवतेचा पाईक: श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
[म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.]
मु. रामनगर- गडचिरोली, फक्त व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here