The गडविश्व
गडचिरोली : विद्यापीठाद्वारे व्यक्तिमत्व विकास शिबिर , आपत्तीव्यवस्थापन, कमवा व शिका योजना, रोजगार मेळावा , राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागवण्याबाबत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परिपत्रक प्रकाशित करण्यात येतात. याबाबत महाविद्यालयाने त्वरित अवलोकन करून आपली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही करावी असे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी विद्यापीठात आयोजित बैठकीत केले. या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी ते होते.
ते पुढे म्हणाले, बरचसे महाविद्यालय वार्षिक अहवालाची माहिती सादर करत नाही. महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अवलोकन करून वार्षिक अहवालाबाबत प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी . तसेच शासनाकडून विद्यापीठाद्वारे येणाऱ्या पत्राच्या अनुषंगाने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणाऱ्या परिपत्रकाच्या अनुषंगाने महाविद्यालयाने तात्काळ माहिती सादर करण्याची कार्यवाही करावी.
ज्या महाविद्यालयाने शिक्षकाचे एकही पद भरलेले नाही अशा महाविद्यालयाने तातडीने रिक्त असलेली पदे भरण्याची प्रक्रिया राबवून रिक्त असलेली पदे भरावी. बऱ्याच महाविद्यालयांनी राखीव निधी व इमारत निधीचा विद्यापीठात भरणा केलेला नाही. अशा महाविद्यालयांनी महिण्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत संपूर्ण उर्वरित रक्कम विद्यापीठात जमा करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
या बैठकीला गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील संस्थेचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते.