माडिया सांस्कृतिक महोत्सव म्हणजे स्थानिक कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ : पालकमंत्री एकनाथ शिंदे

238

– तीन दिवसीय भामरागड माडिया सांस्कृतिक महोत्सवाची सांगता

The गडविश्व
गडचिरोली : दुर्गम भागातील आदिवासी समूहामध्ये एक वेगळ्या प्रकारचे कौशल्य नैसर्गिकरीत्याच असते. यातून विकसित झालेल्या त्यांच्या कलागुणांना आपण या सांस्कृतिक महोत्सवामधून एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे असे उद्गार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमादरम्यान काढले. येथील रेला नृत्य, संस्कृतीचे दर्शन तसेच स्थानिक भाषा बाहेरील पर्यटकांना भामरागड पाहण्यासाठी आकर्षित करतात. भामरागड आणि जिल्ह्यातील इतरही परिसर बारमाही नद्यांच्या प्रदेशातील निसर्गरम्य असा भाग आहे. या ठिकाणी अनेक प्रकारची औषधी वनस्पती, वनोपज मिळतात. निसर्ग संपन्न असलेल्या या जिल्ह्यात विकासात्मक कामेही गतीने होत असल्याचे अलीकडील काळात घडत आहे असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला आदिवासी विकास कार्यालय नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी शुभम गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, नगराध्यक्षा रामबाई महाका, उप नगराध्यक्ष विष्णू मडावी उपस्थित होते. उपस्थित अतिथींच्या हस्ते माडिया सांस्कृतिक महोत्सवातील विविध स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी धनादेश व प्रशस्तीपत्रक वाटप करण्यात आले.
अप्पर आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी अशा प्रकारचे महोत्सव राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये राबवण्यासाठी विचार करता येईल असे सांगितले. त्यासाठी आदिवासी विभागातून आवश्यक ती मदत मिळेल. मानवी मुल्य व संस्कृतीच्या दृष्टीने हा समूह, हा भाग, हा तालुका अतिशय श्रीमंत आहे परंतु आपल्या विकासाच्या व्याख्येत तो मागासलेला दिसून येतो. त्यांनाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन जोमाने कार्य करत असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या भाषणात नमूद केले. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तालुक्यातील विकास रखडल्याचे कारण हा माओवाद असल्याचे सांगून विकासाबरोबरच आदिवासी भागातील संस्कृतीचा वारसा जपणारा हा महोत्सव ठरेल असे मत वक्त केले. तसेच महोत्सवामध्ये विविध स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धकांचे अभिनंदनही त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकपर भाषणामध्ये जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी भामरागडची ओळख ही नक्षल पीडित तालुका, पूर परिस्थिती असलेल्या तालुका, तसेच सर्वात जास्त दुर्गम तालुका असल्याचे सांगितले. अशा या तालुक्यांमध्ये माडिया संस्कृतिक महोत्सव आयोजित करून त्यांच्या कलागुणांना प्रशासनाने चांगल्या प्रकारे वाव दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ही एक त्यांच्यासाठी सुरुवात झाली असली तरी येत्या काळात अशा प्रकारचे भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचे आमचे नियोजन आहे असे ते पुढे म्हणाले. जरी हा तालुका दुर्गम असला तरी प्रशासन विविध योजनांमधून प्रत्येक आदिवासी पाड्यावर योजना पोहचवत असल्याचे चित्र आहे असे ते पुढे म्हणाले.

अदभूत अन न पाहिलेली कला संस्कृती

महाराष्ट्र राज्याच्या एका कोपऱ्यात वसलेल्या निसर्ग संपन्न आदिवासी जिल्हयात भामरागड या अति दुर्गम भागात माडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अदिवासी बांधवांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी विविध स्पर्धा व क्रीडा स्पर्धांचे आयोजन केलं. यावेळी नृत्य, वेशभुषा तसेच खाद्य संस्कृती आणि गुलेल, तिरंदाजी क्रीडा स्पर्धांतून बाह्य जगात कधीही पाहण्यास न मिळालेल्या बाबी महोत्सवात पाहण्यास आल्या. आदिवासी समाज मुळातच त्यांची भाषा, परंपरा व कलेच्या माध्यमातून एकसंघ आहे. आणि याच समूहाचे, त्यांच्या संस्कृतीचे दर्शन जगभर व्हावे या उद्देशाने या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी प्रकल्प कार्यालयाने केले. २५०० स्पर्धक, २००० आयोजक व व्यवस्थापकीय कर्मचारी आणि हाजारो नागरीक दररोज आल्याने भामरागड गाव गजबजून गेला होता. महोत्सवात तीन दिवस जणू काही सणासुदीचे वातावरण होते. याचे सर्व श्रेय भामरागड प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांना जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here