The गडविश्व
गडचिरोली : मुक्तिपथ दारू व तंबाखूमुक्त गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रम, अंतर्गत ७ जानेवारी रोजी मुक्तिपथ गडचिरोली तालुका समितीची बैठक नायब तहसीलदार एन.बी. दांडेकर यांचे अध्यक्षतेत संपन्न झाली.तालुक्यातील अवैध दारू व तंबाखू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध ठराव यावेळी घेण्यात आले.
सदर बैठकीत सर्वप्रथम दारू व तंबाखू नियंत्रण हेतू या अगोदर मुक्तिपथ व विविध प्रशासकीय विभागाद्वारे संयुक्तरित्या केलेल्या प्रयत्नाचे वाचन समितीचे सचिव अमोल वाकुडकर यांनी केले. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार समितीच्या केलेल्या पुनर्गठनुसार सदस्य व कार्यप्रणाली याबाबत सर्व सदस्यांना माहिती देण्यात आली. तसेच मुक्तिपथ तालुका समितीच्या माध्यमातून भरारी पथक दर पंधरा दिवसानी वेगवेगळ्या कार्यालयात दारू व तंबाखूची तपासणी करून दंडात्मक कार्यवाही करणे, ग्रापंस्तरावर समितिची निवड करणे, गडचिरोली शहरात नगर परिषद निवडणुकीदरम्यान बॅनर, पम्पलेट देणे, स्विप कार्यक्रमाअंतर्गत दारूमुक्त निवडणुकीसंदर्भात मतदार जनजागृती करणे, पानठेला व किराणा दुकान धारकाना सुचना नोटिस देऊन तंबाखु विक्री बंद करणे, यासाठी भरारी पथक तयार करणे, तालुक्यातिल अवैध दारु विक्रेत्यांवर केस करणे, मोठ्या तंबाखु विक्रेत्यावर वारंवार कार्यवाही करणे आदी ठराव बैठकीत घेण्यात आले.
यावेळी नपचे शहर व्यवस्थापक गणेश नाईक, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी सुनील मडावी, पोलिस स्टेशनचे कोठारे, उमेदचे नितीन वाघमारे, प्रा. सत्येम पाटील, प्रा. डॉ. जे. जि. उईके, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट, विलास निंबोरकर, मुक्तिपथचे गणेश कोलगिरे, तालुका समितीचे सचिव अमोल वाकुडकर, रेवनाथ मेश्राम आदी सदस्य उपस्थित होते.