मॅरेथॉनमधून दारू व तंबाखूमुक्तीचा केला संकल्प

248

– असरअल्ली येथील उपक्रम उत्साहात 

The गडविश्व
गडचिरोली,२६ सप्टेंबर : सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली येथे गाव संघटना व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने ‘मुक्तिपथ मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतून  गावातील महिला, पुरुष, युवक, युवती यांनी या उपक्रमात सहभाग घेत दारू व तंबाखूमुक्तीचा संकल्प घेतला.

‘दारू व तंबाखू मुक्तीसाठी धावूया’ या मॅरेथॉन स्पर्धेच्या थीम अंतर्गत आयोजित स्पर्धेच्या माध्यमातून गावात दारू व तंबाखू विरोधात संघटन मजबूत व्हावे या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून असरअल्ली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावळे, समाजकार्यकर्ते श्रीनिवास गोतुरी (रायडू), जि.प. मुख्याध्यापक खुर्शिद शेख , गाव संघटनेचे अध्यक्ष पुष्पा मुलकला, भारत गजानन कलाक्षपवार , धर्मराव शाळेचे मुख्याध्यापक  भोवढे आदी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्याध्यापक शेख यांच्यासह इतरांनी दारू व तंबाखूचे दुष्परिणाम पटवून देत व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेची सुरवात करण्यात आली. ही स्पर्धा महिला, पुरुष , युवक ,युवती अशा चार गटात घेण्यात आली. या मॅरेथॉनमध्ये अनेक स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. चारही गटातील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन  तालुका संघटिका  सुनीता भगत, तालुका प्रेरक शंकर गाग्गुरी आणि स्पार्क कार्यकर्ता साईराम सेनिगारपू  यांनी केले. यावेळी महिला व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here