The गडविश्व
गडचिरोली, २९ ऑक्टोबर : चामोर्शी तालुक्यातील येडानूर येथील दारूविक्रेत्यांविरोधात मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या महिलांनी संयुक्तरित्या अहिंसक कृती करीत मोहफुलाच्या सडव्यासह ३० हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे.
काही दिवसांपूर्वी येडानूर येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ग्राम समितीने अवैध दारूविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दारु विक्री बंद झाली होती. मात्र, पुन्हा काही विक्रेत्यांनी चोरट्या मार्गाने आपला अवैध व्यवसाय सुरु केला. त्यामुळे निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या मुजोर दारूविक्रेत्यांना धडा शिकवण्यासाठी महिलांनी अहिंसक कृतीचे नियोजन केले. त्यानुसार गावातील महिला व मुक्तिपथ तालुका चमूने सात विक्रेत्यांच्या घरी भेट देऊन पाहणी केली. यावेळी काही विक्रेत्यांच्या घरी हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची बाब उघडकीस आली. तसेच जवळपास ३० हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट करण्यात आले. यावेळी महिलांसह मुक्तिपथ तालुका चमू उपस्थित होते.