– गावाचा ठराव व मुक्तिपथच्या मार्गदर्शनात गावाची वाटचाल
The गडविश्व
गडचिरोली, ९ नोव्हेंबर : एकेकाळी अवैध दारूविक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या आरमोरी तालुक्यातील कुकडी या गावातून अवैध दारू हद्दपार झाली आहे. हे शक्य झाले ते गावाने केलेल्या दारूविक्रीबंदी ठरावातून व मुक्तीपथच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे. आता जवळपास सहा महिन्यानंतरही गावातील अवैध दारूविक्री बंद आहे.
कुकडी गावाची लोकसंख्या ५७९ एवढी आहे. काही महिन्यांपूर्वी या गावात जोमाने अवैध दारूविक्री केली जात होती. या गावातील अवैध व्यवसायाचा गावासह परिसरातील अनेक गावांना त्रास सहन करावा लागत होता. अशातच गावातील अवैद्य व्यवसायाला आळा घालणे, व्यसनाचे प्रमाण कमी करणे, गावातील लोकांचे आरोग्य चांगले ठेवणे, आर्थिक स्थिति चांगली करणे आणि गावात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी मुक्तीपथ अभियानाने पुढाकार घेतला. त्यानुसार गावसभा घेण्यात आली. गावात दारूबंदी संघटना गठीत करण्यात आली. दरम्यान, दारूबंदी अध्यक्षांनी सभा घेऊन गावातील अवैद्य दारु, सट्टा व जुगार चालविणाऱ्यांना शासकीय दाखले, शासकीय योजना, राशन, महत्वाचे दस्ताएवज, घरकुल, रोजगार हमी आदी योजनांपासून वंचित ठेवण्याचा निर्णय गावसभेच्या माध्यमातून व लोकांच्या सहमतीने जाहीर केला. या निर्णयाचे नोटीस गावाच्या मुख्य ठिकाणी लावण्यासोबतच गावात दवंडी देण्यात आली.
त्यानंतर मुक्तिपथच्या मदतीने ग्रामपंचायत समिती पुनर्गठीत करण्यात आली. दरम्यान, मुक्तिपथ ग्रामपंचायत समितीने विशेष बैठक घेऊन विक्रेत्यांना गावाबाहेर काढण्याचे कठोर निर्णय घेतले. या निर्णयाला प्रतिसाद देत, विक्रेत्यांनी विक्री बंद करण्याची ग्वाही दिली. त्यानंतर चोरट्या मार्गाने दारूविक्री करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करण्यात आली. लोकसहभागातून केलेल्या प्रयत्नांचा परिणाम असा झाला की, मुजोर विक्रेत्यांनी अवैध विक्री बंद केली. सध्या स्थितीत गावातून दारू हद्दपार झाली आहे. गावात शांतता व सुव्यवस्था कायम असून गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे. सोबतच गावातील दारूबंदी टिकवण्यासाठी मुक्तीपथ व ग्रामपंचायत समितीच्या माध्यमातून विविध उपक्रम केले जात आहेत. विशेष म्हणजे लोकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.