वरोरा : वायगाव भोयर येथील शेतकरी सुरेश गरमडे यांच्या एसबीजी-९९७ या सोयाबीन वाणाला कायदेशीर मान्यता

323

– १२ वर्षांचे फलित, सोयाबीन वाणाच्या बाबतीत अधिकार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिले शेतकरी
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथील शेतकरी सुरेश बापूराव गरमडे यांनी नव्या सोयाबीन वाणाचे संशोधन केले. एसबीजी-९९७ असे त्या सोयाबीन वाणाचे नाव. त्यांनी संशोधन केलेल्या या वाणाला केंद्र सरकारच्या दिल्लीस्थित वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाने कायदेशीर मान्यता दिलेली आहे. यानुसार १५ वर्षांसाठी त्यांना उत्पादन, विक्री, बाजार, वितरण, आयात आणि निर्यात करण्याचे अधिकार मिळालेले आहेत. सोयाबीन वाणाच्या बाबतीत असे अधिकार मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले शेतकरी ठरले आहेत.
१२ वर्षांपूर्वी गरमडे यांच्या सोयाबीन शेतात वेगळ्या गुणधर्माच्या दोन वनस्पती आढळून आल्या. धानाच्या एचएमटी वाणाचे जनक स्व. दादाजी खोब्रागडे यांचा आदर्श समोर ठेवून त्यांनी सतत आठ वर्षे बियाण्याची वाढ करीत त्याचे जतन व संवर्धन केले. हे वाण प्रतिकूल हवामानातही ‘यलो मोझॅक’ रोगाला बळी पडत नाही. एकरी १७ क्विंटल उत्पादन देते. या वाणाच्या झाडाची उंची ७५ सेंटीमीटरपर्यंत असते. एका झाडाला १४० ते १५० शेंगा लागतात. तीन ते चार दाण्याच्या शेंगा सर्वाधिक असतात. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी गरमडे यांच्या शेतीची वारंवार पाहणी केली होती. एकच निष्कर्ष हाती येत असल्याने कृषी अधिकारीदेखील थक्क झाले होते, असा दावा सुरेश गरमडे यांनी केला आहे.
गरमडे यांनी वनस्पती विविधता आणि शेतकरी हक्क संरक्षण कायदा २००१ अंतर्गत महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या पाठपुराव्यातून पुणे येथील पेटंट प्राधिकरण कार्यालयात मे २०१८ मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. हा प्रस्ताव दिल्ली येथील मुख्य कार्यालयात पाठविला गेला. त्यानंतर तीन वर्षे सोयाबीन संशोधन केंद्रात या वाणाचा मागोवा घेतला गेला. तिथेही हे वाण सरस आणि वेगळे आढळून आल्याने हे पेटंट मिळाले आहे.
प्राधिकरणाचे उपसचिव डॉ. एस. बी. गुरव, आत्मा संचालक मनोहरे, तत्कालीन कृषी विकास अधिकारी शंकर किरवे, कृषी अधिकारी जयंत धात्रक, तालुका कृषी अधिकारी प्रकाश, आत्मा तालुका समन्वयक घागी, प्रगतिशील शेतकरी विनोद राऊत, श्रीकांत एकुडे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here