वैज्ञानिक अर्थ कळो, गैरसमज दूर पळो !

379

दीप/ गटारी अमावस्या- आषाढ अमावस्या विशेष

संध्याकाळी देवासमोर दिवा लावून “शुभं करोति कल्याणम्” म्हणून घरातील वडीलधार्‍यांना नमस्कार करणे, हे संस्कार पिढ्यांपिढ्या चालत आले आहे. आता आधुनिक जगात वि‍जेच्या दिव्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो. कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधारास दूर करतो आणि नजरेलाही सुखद, पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे, हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवतात. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटतात, फुलांची आरास करतात. सर्व दिव्यांमध्ये तेल, वात घालून प्रज्वलित करतात. कणकेचे गोड दिवे- उकडलेले बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मनोभावे पूजा करतात. गोडाचा नैवेद्य दाखवतात. यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात-
“दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥”
(हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर.) त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते. आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असे धार्मिक ग्रंथात म्हटले आहे. या पूजाव्रताची कथा अशी-
तमिळ देशाच्या पशुपती शेट्टी नावाच्या श्रेष्ठीला विनीत व गौरी अशी दोन अपत्ये होती. लहानपणीच दोघांनी ठरवले, की गौरीला ज्या मुली होतील त्या तिने विनीतच्या मुलांना द्याव्या. पुढे गौरीला तीन मुली तर विनीतला तीन मुले झाली. गौरीच्या धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते. गौरीच्या घरात लक्ष्मी नांदत होती. परंतु विनीतचे दैव फिरल्याने तो दरिद्री झाला. भावाचे दैन्य पाहून ती वचन विसरली व पहिल्या दोन मुलींची लग्ने श्रीमंतांच्या घरात केली. नंतर सगुणाचा विचार करू लागली. आईने आपले वचन मोडले ही गोष्ट ऐकून सगुणास वाईट वाटले. तिने विनीतच्या धाकट्या मुलाशी लग्न करण्याचे ठरविले. गौरी तिच्यावर संतापली. परंतु तिने हेका सोडला नाही. लग्न करून ती विनीतच्या घरी आली. गरीबीतच संसार सांभाळू लागली. एके दिवशी नगरचा राजा स्नानासाठी गेला असता त्याची कट्ट्यावर ठेवलेली रत्नजडित अंगठी घारीने पळविली. ती सगुणाच्या घरावर येऊन बसली. ती खाण्याची वस्तू नसल्याचे कळल्यावर ती तेथेच टाकून उडून गेली. सगुणा ती घेऊन राजाकडे गेली. राजाने प्रसन्न होऊन बक्षीस देत अजून काही हवे असेल ते मागण्यास सांगितले. सगुणाने मागितले, “येत्या शुक्रवारी राज्यात फक्त माझ्याच घरी दिवे लागतील. इतरांनी घरी दिवे लावू नये, असा हुकूम काढा.” राजाने तसेच केले. शुक्रवारी तिने घरभर दिवे लावून उपवास केला. आपल्या दोन्ही दिरांना पुढच्या व मागच्या बाजूला उभे केले. येणारी व जाणारी सवाष्ण बाई परत फिरू द्यायची नाही असे बजावले. त्यामुळे लक्ष्मी घरात राहिली व अवदसा कायमची हद्दपार झाली. लोक तिलाच लक्ष्मीचा अवतार मानू लागले.
आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे, प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते. घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दिप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी, हेच आपली संस्कृती सांगते. काही ठिकाणी या दिवशी पित्रृ तर्पण देतात. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात. पितरांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृ तर्पण होय. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात, असे मानले जाते.
दीप अमावस्येलाच गटारी अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी भरपूर मांस मच्छी खाऊन दारू पिण्याचे आयोजन बरेच लोक करतात. असे करण्याचे कारण शोधल्यास हे लक्षात येते की, या दिवसानंतर पवित्र श्रावण मास सुरू होतो. या महिन्यात बहुतेक लोक कांदा लसूण व अभक्ष्य भक्षण बंद करतात. गटारांत पडेपर्यंत दारू डोसण्याच्या अघोरी प्रथेमुळे की काय? काही कळत नाही, मात्र गटारी अमावस्या म्हणून या दिवसाची टिंगल केली जाते. श्रावणापासून जोरदार पाऊस पडतो. हवा कुंद असल्यामुळे पचनशक्तीही कमकुवत झालेली असते. त्यामुळे जड अन्न पचत नाही. हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो, म्हणून मासे खाणे योग्य नसते. कदाचित यामुळेच श्रावणात एक भुक्त राहणे, नक्त करणे किंवा उपवास करण्याची पद्धत सुरू झाली असावी. श्रावणाच्या आधीच मनसोक्त खाऊन पिऊन घ्यावे म्हणून बरेच लोक गटारी अमावस्या साजरी करतात. पण हे चुकीचे आहे. सद्याच्या काळात तर त्याला फारच जोर आला आहे. परंतु आपण ही प्रथा मोडीत काढली पाहिजे. जास्तीत जास्त चांगल्या गोष्टींचा प्रसार करून लोकजागृती केली पाहिजे. चला तर मग धार्मिक विधींचा योग्य वैज्ञानिक अर्थ सांगून गैरसमज दूर करुया आणि दीप पूजेच्या तयारीला लागुया.
!! The गडविश्व परिवारातर्फे दीप अमावस्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

– श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी.
गडचिरोली, व्हॉ. नं. ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here