व्यसनापासून दूर राहा, मुलचेरातील २ हजार ६२२ विद्यार्थ्यांना आवाहन

370

The गडविश्व
गडचिरोली : व्यसनाधीनतेमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होतात. अनेक तरुण-तरुणी व शाळकरी मुलेही व्यसनाचे विळख्यात सापडले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना जागृत करणे आवश्यक असून मुक्तिपथ अभियानाने तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या अंतर्गत मुलचेरा तालुक्यातील विविध गावांतील एकूण ३२ शाळांमधील २ हजार ६२२ विद्यार्थ्यांना खेळाच्या माध्यमातून व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देत व्यसनापासून स्वतः व कुटुंबाला दूर ठेवण्याचे आवाहन केले.
मुलचेरा तालुक्यातील विश्वनाथनगर, विजयनगर, सुंदरनगर, रेंगेवाही, कोठारी, खुदिरामपल्ली, हरिनगर, हरीनगर २, मालेरा, गांधीनगर, कोपरअली माल, गीताली, भवानीपूर, गांधीनगर २, देशबंधुग्राम, बोलेपली, विवेकानंदपूर, अडपल्ली चक, शांतिग्राम, कोपरअल्ली माल, देवदा, देवनगर, श्रीनगर, मथुरानगर, अडपल्ली माल, गोविंदपूर लगाम, लगाम चक, लोहारा, आंबटपल्ली या गावांतील ३२ शाळांमध्ये उपक्रम घेण्यात आले. या उपक्रमात एकूण २६२२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत व्यसनमुक्तीचे धडे गिरविले.
उपक्रमात तंबाखू व दारू व्यसनाबाबत गावातील ८ ते १५ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. जे विद्यार्थी तंबाखू, खर्रा खात नाही त्यांनी पुढे खाऊ नये. वर्गातील किंवा गावातील सहकारी मित्र खात आहे, त्यांना खाण्यापासून वाचवावे, वडील-आई खर्रा खात असल्यास त्यांना खाऊ नका, अशी विनंती करावी. दुकानात खर्रा किंवा तंबाखू पदार्थ आण्यास जाऊ नये. कुणी आग्रह केल्यास नाही म्हणावे. विद्यार्थ्यांनी गावाचे व शाळेचे व्यसनमुक्तीचे सैनिक बनावे व भविष्यात व्यसनाच्या मार्गाला लागू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच गीत, तार टपाल टेलिफोन ,डॉज बाल अशा विविध खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. व्यसनाचे दुष्परिणाम व गांभीर्य सांगण्यात आले. गावात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत ‘आमची शाळा तंबाखूमुक्त करु’ असा संकल्प घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here