The गडविश्व
गडचिरोली : स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा -2 अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना शौचालय बांधकाम करावयाचे आहे अशा लाभार्थ्यांकरीता अनुदान मागणी प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आले आहे. या अनुदान मागणी ऑनलाईन प्रणालीचा लाभ गडचिरोली जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम पूर्ण झाल्यावर रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येते. यामध्ये ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लाभार्थी निश्चित करुन पंचायत समिती व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जि.प. गडचिरोलीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या वेबसाईडवर ऑनलाईन करण्यात येते. लाभार्थी निश्चित झाल्यावर शौचालय पूर्ण करुन त्या शौचालयाचा फोटो जिओटॅग केल्यानंतर लाभार्थ्यांना शौचालय प्रोत्साहन अनुदान वितरीत करण्यात येत होते. स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील ज्या कुटूंबाकडे वैयक्तिक शौचालय अद्यापपर्यंत नाहीत अशा लाभार्थ्यांना आता ऑनलाईन प्रणाली द्वारे शौचालय प्रोत्साहन अनुदान करीता मागणी करता येणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी मोबाईल, कॉम्प्युटर, सायबर कॅफे अथवा इतर सामान्य ऑनलाईन सेवेद्वारे http://sbm.gov.in/sbmphase2/homenew.aspx या संकेतस्थळावर भेट देऊन पुढीलप्रमाणे रजिस्ट्रेशन करावयाचे आहे. टप्पा -1- लाभार्थ्यांचे मोबाईल नंबरचे माध्यमातून लॉगईन आयडी व पासवर्ड तयार करण्यात यावे. टप्पा -2- लॉगईन केल्यानंतर New Application यावर क्लिक करुन लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती भरावी. त्यानंतर लाभार्थ्यांचा आधार कार्ड व्हेरीफिकेशन करावा. टप्पा-3- संपूर्ण माहिती भरल्यानंतर लाभार्थ्यांचे बँक खात्याची माहिती भरुन पासबुकाची पहिल्या पानाची फोटो अपलोड करावी. असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रकल्प संचालक जल जीवन मिशन तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व), जिल्हा परिषद, गडचिरोली, फरेन्द्र कुतीरकर यांनी कळविले आहे.