– गडचिरोली ते मुंबई पैदल काढणार मार्च
The गडविश्व
गडचिरोली : महाराष्ट्रभरात आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याकरीता हंगामी क्षेत्र कर्मचारी रस्त्यावर उतरून गडचिरोली ते मुंबई असा पैदल मार्च काढणार आहेत. याबाबत काल अहेरी विश्रामगृह येथे हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली यावेळी संघटनेच्या वतीने तसा निर्धार करण्यात आला.
सध्या महाराष्ट्रात आरोग्य सेवकाचे पाच हजार चारशे ब्याणव पदे मंजूर आहेत. परंतु 29 सप्टेंबर 2021 च्या अधिसूचनेतील बदललेल्या सेवाप्रवेश नियमामुळे सर्व हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊन त्यांची शासकीय नोकरी भरतीची दावेदारी संपुष्टात आली आहे. शासनाने ही अधिसूचना तात्काळ रद्द करावी .वर्षानुवर्षे आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या सर्व हंगामी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. यासाठी हा पैदल मार्च काढण्यात येणार आहे. आरोग्य शासनाच्या हिवताप विभागाअंतर्गत कार्य करणाऱ्या असंख्य हंगामी कर्मचाऱ्यांचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न करून थकलेल्या कर्मचाऱ्यांना आता हे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील अगदी शेवटच्या टोकाला असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त हंगामी क्षेत्र कर्मचाऱी आहेत. हा जिल्हा नक्षलग्रस्त असल्याने या ठिकाणी कारखाने नाहीत. घनदाट जंगलाने आच्छादलेल्या या जिल्ह्यात अजूनही जीवनावश्यक मुलभूत सुविधांचा अभाव आहे. अजूनही संपर्क व दळणवळण क्षेत्रात काही गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते सुद्धा नाही. शिवाय ग्रामीण भागातील निकृष्ट राहणीमानाच्या सवयीमुळे या जिल्ह्यात मलेरियाचा प्रकोप दरवर्षी पाहायला मिळतो, कित्येक रुग्ण दगावतात. घनदाट जंगलामुळे देखील मच्छरांची संख्या खूप आहे. त्यामुळे मलेरिया रेडझोन असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अधिक प्रभावी यंत्रणेची गरज आहे. गावागावात अंतर खूप असल्याने. तसेच दोन गावांमध्ये घनदाट जंगल असल्याने प्रत्येक गावात एका दवाखान्याची गरज आहे. मलेरिया रोखण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ हवे. गावा गावातच एक आरोग्यसेवक हवा. या दृष्टिकोनातून विचार केल्यास जिल्ह्यातच हजारो लोकांना नियुक्ती देऊन आरोग्यसेवेच्या यंत्रणेला अधिक बळकट करता येईल. 400 किलोमीटर विस्तार असलेल्या या जिल्ह्यात प्रत्येक गावात दवाखाना, त्या दवाखान्यात निवासी डॉक्टर, नर्स, आरोग्य सेविका, यांची संख्या वाढवायला हवी. पी.एस.सी तसेच आर. एच. आणि जिल्हा उप रुग्णालयाची संख्यासुद्धा नक्षलग्रस्त अभावग्रस्त विशेष जिल्हा म्हणून वाढवायला हवी. जिल्हा रुग्णालयात देखील अतिदक्षता विभागात डॉक्टरांची संख्या अपुरी आहे. रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी दवाखान्याची सोय शासनाकडून करण्यात यावी, ॲम्बुलन्स तसेच इतर उपयोगी उपकरणांची संख्या वाढवण्यात यावी, 2016 मध्ये नियुक्ती केलेल्या 839 हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी जिल्ह्यात केवळ 19 जागा होत्या परंतु महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात पात्र उमेदवार मिळाले नसल्यास या सर्वांना जिल्ह्यातच किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यात सामावून घेतल्यास त्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवता येईल, जिल्हा परिषद आरोग्य भरती, गट’ क’ व ‘ड ‘चे पेपर लवकर घ्यावे, कोरोना व मराठा आरक्षणामुळे रखडलेली पद भरती १०० टक्के करावी, महाराष्ट्रभरातील सर्व हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांचे एकवेळ संपूर्ण समावेशन करावे, या सर्व मुद्यांना धरून पैदल मार्च काढण्याचे अहेरी याठिकाणी ठरविण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य राशिद शेख तसेच उपाध्यक्ष ज्ञानदीप गलबले, कोषाध्यक्ष सुरज बबनवाडे, सचिव मिलिंद खेवले, तालुकाध्यक्ष अर्फाज सय्यद तसेच अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, मुलचेरा व चामोर्शी तालुक्यातील हंगामी क्षेत्र कर्मचारी उपस्थित होते.