३१ जुलै पुर्वी पीएम किसान योजनेची ई-केवायसी पूर्ण करा

532

The गडविश्व
गडचिरोली, २५ जुलै : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास (पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये) २ हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे ३ हप्त्यात ६ हजार रुपये प्रती वर्षी लाभ त्यांच्या बँक खात्यात थेट (DBT द्वारे) जमा करण्यात येत आहे. आज अखेर या योजने अंतर्गत राज्यातील १०९. ९७ लाख लाभार्थ्यांना एकुण रक्कम २०१८७. ०४ कोटी लाभ अदा करण्यात आलेला आहे. या लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणुन केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे e-KYC पडताळणी ३१ जुलै २०२२ पुर्वी पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
सदरची e-KYC पडताळणी ३१ जुलै २०२२ पर्यंत पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांनाच पी.एम.किसान योजनेचा पुढचा हप्ता वितरीत करण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाचे निर्देश आहेत. यासाठी लाभार्थ्यास स्वतः पीएम किसान पोर्टलवर https://pmkisan.gov.in/ या लिंक आधारे किंवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) मार्फत e-KYC पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या दोनपैकी स्वत:च्या सोईनुसार एका सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याची e-KYC पडताळणी करता येणार आहे.
पीएम किसान पोर्टलवरील https://pmkisan.gov.in/ या लिंक द्वारे e-KYC करतांना लाभार्थ्यास त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणाऱ्या OTP आधारे स्वत:चे e-KYC पडताळणी करता येईल. यासाठी कोणतीही फी आकारणी केली जाणार नाही. तसेच सामाईक सुविधा केंद्र (CSC) मध्ये जाऊन लाभार्थी biometric पद्धतीद्वारे e-KYC पडताळणी करून घेऊ शकतात. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून रक्कम रू. १५ रुपये प्रती लाभार्थी फी आकारणी करण्यात येईल.
राज्यात २२ जुलै, २०२२ अखेर एकुण ६१.३३ लाख लाभार्थ्यांचे e-KYC पडताळणी पुर्ण करण्यात आली आहे. उर्वरीत लाभार्थ्यांनी स्वत: अथवा सामाईक सुविधा केंद्र (CSC) च्या माध्यमातून त्यांचे e-KYC पडताळणी केंद्र शासनाने दिलेल्या ३१ जुलै, २०२२ मुदतीपुर्वी पुर्ण करावे, असे आवाहन उपआयुक्त (कृषि गणना) तथा पथक प्रमुख पी.एम.किसान कृषि आयुक्तालय महाराज्य राज्य पूणे,विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here