The गडविश्व
मुंबई, ९ सप्टेंबर : राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे एकूण २३ लाख ८१ हजार ९२० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून २५ लाख ९३ हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी ३ हजार ५०१ कोटी रुपयांची मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने वितरीत करण्यात येणार आहे.
आपदग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर मदत तातडीने वितरीत करण्याचा आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून काढण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांच्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार जिरायत शेतीसाठी पूर्वीचा दर प्रति हेक्टरी ६८०० वरून वाढवून प्रति हेक्टरी १३ हजार ६०० रुपये,बागायत शेतीसाठी प्रति हेक्टरी १३ हजार ५०० रूपयांवरन २७ हजार रुपये आणि बहुवार्षिक शेतीसाठी पूर्वीचा दर १८ हजार रूपयांवरून ३६ हजार रुपये करण्यात आला आहे.जिरायत,बागायत व बहुवार्षिक पिकांच्या बाबतीत यापूर्वी दोन हेक्टरच्या मर्यादेत वाढ करून प्रती तीन हेक्टर अशी वाढ करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांसाठीचा मदतीचा निधी संबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ऑनलाइन पद्धतीने जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.याबाबतचा शासननिर्णय महसूल व वन विभागाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी निर्गमित केला.