अत्यंत गरिबीतून वर आलेले व्यक्तिमत्व !

259

मामा परमानंद जयंती विशेष

नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांचे संपादकीय कौशल्य वाखाणण्याजोगे होते. राज्याकारभारविषयक प्रश्न समतोलपणे व योग्य प्रमाणात हाताळण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. जनतेच्या अडचणींची चौकशी करून त्याचा निर्भीडपणे पाठपुरावा केला जाई. प्रश्नाचा निट विचार करून, त्याच्या सगळ्या बाजू समजून, त्यावर मोजक्या शब्दात पण ठामपणें मतप्रदर्शन करणे, अशी त्यांची भूमिका असे. पत्रकारितेचे हे व्रत त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता स्वीकारले होते. न्यायमूर्ती रानडे त्यांचा उल्लेख आमचे राजकीय ऋषी, असा करत.
मुंबईतील नामवंत कायदेपंडित रावसाहेब विश्वनाथ मांडलिक यांना लेखनाची विशेष आवड होती. परंतु त्यांच्याकडे वृत्तवत्र चालवण्याइतपत भाग-भांडवल नव्हते. आपला मानस बोलून दाखवताच दादाभाई नौरोजीनी मदतीचे आश्वासन दिले. या पत्राची आर्थिक बाजू मंडलिक आणि कृष्णाजी मुलजी यांनी स्वीकारली. संपादकीय जबाबदारी नारायण महादेव उर्फ मामा परमानंद यांच्यावर सोपवण्यात आली. अशा रीतीने नेटिव्ह ओपिनियनचा पहिला अंक ४ जानेवारी १८६४ रोजी प्रसिद्ध झाला. याची पूर्ण संपादकीय जबाबदारी मामा परमानंद यांच्यावरच होती. दोनशे रुपये महिना पगारावर त्यांची नियुक्ती झाली. दोन वर्षे इंग्रजीतून निघाल्यानंतर १ जुलै १८६६पासून हा अंक मराठीतूनही निघू लागला. युरोपियन आणि नेटिव यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी हे पत्र सुरू झाले. हिंदी राजकारणाचा त्यांना सखोल अभ्यास होता. महाराज सयाजीराव गायकवाड, सर विल्यम वेडरबर्न, रानडे, तेलंग, चंदावरकर, मलबारी, मोतीलाल घोष वगैरे ख्यातनाम मंडळी त्यांचा सल्ला घेत असत. साधुशील- सत्प्रवृत्तीचे मामा मुंबई प्रार्थनासमाजाचे एक ध्येयनिष्ठ, निष्ठावंत व समर्पित कार्यकर्ते होते. बिछान्यास खिळून असतानाही त्यांनी शेवटपर्यंत सुबोध पत्रिकेसाठी लेखन केले. ते एक कृतिशील धर्मी व समाजसुधारक होते. धर्म सुधारल्याशिवाय आपल्या देशाची सर्वांगीण उन्नती होणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते. बेन्जामिन फ्रँक्लिनच्या चरित्राचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. न्या.रानडे यांनी त्यांना राजकीय ऋषी या महनीय पदवीने गौरविले. मामांचा अवघा संसार परमार्थावर आधारलेला होता. त्यांचे घर म्हणजे विद्यार्थ्यांचे आश्रयस्थान, अनेक परस्थ थोर थोर पुढाऱ्यांच्या व पाहुण्यांच्या वर्दळीचे ठिकाण व पुनर्विवाहितांचा आश्रम असेच होते. त्यांच्या पत्नी जानकीबाई यांनी सहधर्मचारिणी या नात्याने त्यांना अखेरपर्यंत चांगली साथ दिली. मामांचा स्वभाव प्रसिद्धीविन्मुख व सोशिक होता.
मामा परमानंद हे प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक होते. त्यांचा जन्म ३ जुलै १८३८ रोजी कोकणात सावंतवाडी नजिकच्या माणगाव या खेड्यात झाला. त्यांचे संपूर्णनाव नारायण महादेव परमानंद; तथापि मामा परमानंद याच नावाने ते प्रसिद्ध आहेत. मामांचा जन्म झाल्यावर वडील महादेव दुसऱ्या वर्षीच वारले. आई गंगाबाई हिने तिच्या भावाच्या मदतीने असलेले दुकान चालवून मामांचे प्राथमिक शिक्षण केले. दहाव्या वर्षी मामा मुंबईस बहिणीकडे गेले असताना त्यांची हुशारी व महत्त्वाकांक्षा पाहून त्यांचे मेहुणे कृष्णशेट तिरवेकर यांनी पुढील शिक्षणार्थ त्यांना मुंबईसच ठेवून घेतले. पूर्वी अत्यंत गरिबीत झालेले अर्धवट मराठी शिक्षण पूर्ण करून मामा सरकारी सेंट्रल स्कूलमध्ये चार वर्षे शिकले. पुढे कॉलेजातही गेले. मेहनती व जात्याच बुद्धिमान विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवून पहिल्या वर्गातील स्कॉलर म्हणून लौकिक संपादन केला.
मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर मॅट्रिकची परीक्षा देऊन ते बीए परीक्षेसही बसले होते; पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले आणि एल्फिन्स्टन हायस्कुलात शिक्षकाची नोकरी धरावी लागली. तेथे उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यांच्या हाताखाली नामवंत अनेक विद्यार्थी तयार झाले. उदा- प्रसिद्ध संशोधक काशिनाथपंत तेलंग हे त्यांचेच विद्यार्थी होत. पुढे सिंधमध्ये बदली झाली, तिकडेही त्यांनी उत्तम काम केले; पण हवा न मानवल्यामुळे मुंबईसच यावे लागले. शिक्षकी पेशा सोडून वृत्तपत्र संपादन व लेखन या सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी आमरण मोठे यश व कीर्ती मिळविली. इंदुप्रकाश, नेटिव ओपिनिअन, इंडियन स्पेक्टॅटर व विशेषतः सुबोध पत्रिका- मुंबई प्रार्थना समाजाचे मुखपत्र या वृत्तपत्रांची जबाबदारी अंगावर घेऊन ती निर्भीड व निःस्पृहपणे पार पाडली. मामांचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. त्यांचे लेखन सुबोध, चटकदार, मार्मिक व निश्चयात्मक मते मांडणारे होते. दैनंदिन राजकीय घडामोडींवरील त्यांची टीका भारदस्त व न्यायनिष्ठुर असे. तत्कालीन अनेक भ्रष्टाचारी प्रकरणांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला; यूरोपिअन अंमलदारांचा देखील बेबंदपणा त्यांनी उघडकीस आणला व हाच रोष त्यांना सरकारी नोकरीत नडला. संस्थानी कारभार व त्याची सुधारणा यावरही मामांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले. कच्छच्या संस्थानिकाने त्यांना नायब दिवाण नेमले. तेथील गुंतागुंतीचा कारभार मामांच्या सरळ, शांत व सभ्य स्वभावाला मानवला नाही आणि राजीनामा देऊन ते मुंबईस परत आले. हिंदी लोकांचे मित्र व हितचिंतक सर विल्यम वेडरबर्न हे मामांची योग्यता व कार्यक्षमता जाणणारे होते. त्यांनी ते मुंबई उच्च न्यायालयात प्रबंधक असताना मामांना उपप्रबंधक म्हणून नेमले. पुढे त्यांनीच मामांना मजूर खात्याचे सेक्रेटरी केले. नंतर मामा महसूल व सामान्य खात्याचे अधिक्षक देखील झाले. पण कामाच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली व शेवटपर्यंत त्यांना घरीच बिछान्यावर खितपत पडून रहावे लागले.
तरुणास उपदेश-पितृबोध, त्याच्या इंग्रजी, मराठी व गुजराती भाषेतही आवृत्त्या निघाल्या. मामांची एका संस्थानिकास बारा पत्रे- मूळ इंग्रजी १८९१- मराठी भाषांतर १९६३, एच्ए, ॲक्वर्थ यांना मराठी पोवाडे संकलित करण्याच्या कामी त्यांनी बहुमोल सहकार्य केले. त्यांचा उपलब्ध असलेला इंग्रजी व मराठी पत्रव्यवहार आजही महत्त्वाचा आहे. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी मामांची योग्यता व कार्य चांगले जाणले होते. महात्मा जोतीराव फुले यांच्या शेवटच्या आजारात आर्थिक साह्य मिळावे, म्हणून बडोदे सरकारला मामांनी लिहिलेली पत्रे फुलेंच्या चरित्रावर व कार्यावर चांगला प्रकाश टाकणारी ठरली आहेत. सर्व वर्ग व सर्व थरांतील समकालीन मोठमोठ्या कर्त्या पुढाऱ्यांचे ते सल्लागार होते. मुंबईस त्यांच्या राहत्या घरी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी दि.१३ सप्टेंबर १८९३ रोजी त्यांचे देहावसान झाले. त्यावेळी मित्र व सहकारी डॉ.रामकृष्ण भांडारकर, शांताराम विठ्ठल, तुकाराम तात्या, नारायण चंदावरकर, भास्कर हरि भागवत, श्रीधरपंत भांडारकर वगैरे जीवाभावाची मंडळी सभोवती जमलेली होती.
!! गडविश्व न्यूज नेटवर्क परिवारातर्फे जयंतीच्या पावन पर्वावर विनम्र अभिवादन !!

श्री एन. के. कुमार, से.नि.अध्यापक.
गडचिरोली, फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here