– गोडंवाना विद्यापीठा तर्फे “आदिवासी गौरव प्रवास-अनुभवातून नेतृत्व” या विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा
The गडविश्व
गडचिरोली : आपल्याला कोणीही कितीही शिकवले तरी अनुभवातून घेतलेले शिक्षण हे खूप महत्त्वाचं असते. ते कधीही आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्यामुळे आजपासून जो कार्यक्रम सुरू होतो तो अनुभव घेण्याचा उपक्रम आहे, असे प्रतिपादन विजय जोशी, जनरल मॅनेजर, रूसा यांनी केले.
रुसा द्वारे तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य फॅकल्टी डेव्हलपमेंट अकादमीद्वारे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापकांना “आदिवासी गौरव प्रवास- अनुभवातून “नेतृत्व ” या विषयावर पाच दिवसीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. गोंडवाना विद्यापीठ या प्रशिक्षणाचे आयोजक आहेत. या प्रशिक्षणाचे उद्घाटन आनंद वन येथे आज पार पडले या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, विशेष उपस्थिती म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, आणि आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, सध्याच्या काळात कृतीतून जीवन शिक्षणाची गरज आहे. आपण बघतो की शिक्षण मुख्यतः वर्ग खोल्यांमध्ये होत असते. अनुभवात्मक नेतृत्व प्रशिक्षण अधिक प्रभावी होऊ शकते. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही दुर्गम भागात प्राध्यापक मोठ्या सामाजिक प्रकल्पांचा अनुभव घेतील आणि त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशाचा अनुभव घेतील. अनुभवात्मक शिक्षण हे सर्व शिकण्याच्या अनुभवाच्या केंद्रस्थानी असते. चंद्रपूर आणि गडचिरोली जो महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग आहे. या जिल्ह्यात आरोग्य सेवा, शिक्षण, जंगल व्यवस्थापन इत्यादी विविध आघाड्यांवर काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. या भागात आदिवासींचे (36% लोकसंख्येच्या) प्राबल्य आहे, आणि त्यामुळे विविध स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या कामाचा परिणाम थेट लाभार्थ्यांवर दिसून येतो. त्यामुळे राज्यभर पसरलेल्या विद्यापीठांच्या प्राध्यापकांना शिकण्याच्या भरपूर संधी आहेत.
म्हणून स्वयंसेवी संस्थांकडून सुरू असलेल्या या सर्व मौल्यवान प्रयत्नांबद्दल शैक्षणिक संस्था पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्यामुळे गोंडवाना विद्यापीठाने महाराष्ट्राच्या इतर भागातील प्राध्यापकांना विद्यापीठाच्या परिसरात राहणार्या आदिवासी आणि ग्रामीण लोकांची स्थिती तसेच आदिवासी लोकांच्या जीवनावर विविध स्वयंसेवी संस्थांच्या कार्याचा प्रभाव याविषयी प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे .
याप्रसंगी प्रास्ताविक डॉ. मृणाल काळे यांनी केले, आभार प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी मानले तर संचालन शारीरिक शिक्षण संचालक आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा यांनी केले.