– महाराष्ट्र राज्य हंगाम क्षेत्र कर्मचारी संघटना गडचिरोली ची मागणी
The गडविश्व
गडचिरोली : अन्यायकारक अधिसूचनेत दुरुस्ती करून जिल्हा परिषद आरोग्य पदभरती तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना गडचिरोली द्वारा करण्यात आली आहे.
मुंबई येथील आजाद मैदानात उपोषण करून परतलेल्या महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटनेचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम गडचिरोली येथे पार पडला. यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील हंगामी क्षेत्र कर्मचारी उपस्थित होते.
२९ सप्टेंबर २०२१ ची लागू झालेली अधिसूचना ही आरोग्य शासनाच्या हिवताप विभागात कार्यरत हंगामी फवारणी तसेच हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक आहे. यातील सेवा प्रवेशनियम अटी ह्या अतिशय जाचक आहेत. हंगामी कर्मचाऱ्यांची नेमणूक चौथी पास तसेच दहावी पास या शैक्षणिक अर्हतेवर केल्या गेली होती. ९० दिवसाचे कामाचे अनुभव असल्यानंतर मिळणाऱ्या प्रमाणपत्राच्या आधारावर शासकीय नोकरीत आरोग्य सेवक एम .पी. डब्ल्यू च्या जागेवर नेमणुकीसाठी पन्नास टक्के कोटा राखीव असायचा. परंतु शासनाने तो कोटा रद्द केला आहे. फवारणी तसेच हंगामी क्षेत्र कर्मचारी यांना या कामाचे अनुभव असल्याने तसेच त्यांनी वर्षांनुवर्षे सेवा दिल्याने या पन्नास टक्के कोट्यावर त्यांचीच प्रबळ दावेदारी असून त्यांचे हक्क कोटा रद्द करून हिरावण्यात आले आहे . त्याच प्रमाणे आरोग्य सेवेत नियमित क्षेत्र कर्मचारी गट-ड चे फार्म भरण्यासाठी आत्ता ९० दिवसाऐवजी १८० दिवस अनुभवाची गरज भासणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात राज्यातील ७५ टक्के मलेरियाचा प्रादुर्भाव असूनही तेथे नियमित ऑर्डर निघत नाहीत. २०१६ साली नियुक्त केलेल्या ८३९ हंगामी क्षेत्र कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश लोकांचे नव्वद दिवस अजूनही पूर्ण झालेले नाही. मग १८० दिवस पूर्ण करण्यासाठी अजून किती वर्ष वाट पहावी लागेल हे सुद्धा सांगता येत नाही. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष गट- क-चे फार्म भरण्यासाठी आत्ता बारावी विज्ञान पास ची अट लागू झालेली आहे. कला शाखेच्या च्या बहुतांश मुलांसाठी वेळेवर बारावी विज्ञान ही अट पूर्ण करणे अशक्य आहे. कारण कला शाखेमधून अकरावी, बारावी केलेल्या मुलांना आता कुठले विज्ञान महाविद्यालय प्रवेश देईल.? त्याशिवाय सॅनिटरी इन्स्पेक्टर चा कोर्स सुद्धा अनिवार्य करण्यात आला आहे. बहुतांश मुले विज्ञान शाखेतील नसल्यामुळे ते करणे सुद्धा अशक्य आहे. म्हणून ५० टक्के राखीव कोटा पूर्ववत करून, बारावी पास कोणत्याही शाखेतून करावे, सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स पास डिप्लोमा हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी यांसाठी रद्द करण्यात यावा. अनुभवाची अट ९० दिवसच राहू द्यावी, २०१९ मध्ये फॉर्म भरलेल्या जिल्हा परिषद आरोग्य पदभरती च्या मुलांची परीक्षा तात्काळ घेण्यात यावी. पेपर फुटी मुळे रखडलेल्या गट’ क’ आणि’ ‘ड’ च्या परीक्षासुद्धा लवकर घ्यावी. २८ फेब्रुवारी २०२१ परीक्षेतील गुणवत्ताधारकामधूनच उर्वरित पन्नास टक्के जागा भरून शंभर टक्के पदभरती पूर्ण करावी. सध्या सुरू असलेल्या रखडलेल्या पदभरतीत, मागील २०१६ च्या पदभरती प्रमाणेच, माजी सैनिक चे रिक्त पद अगेन्स्ट कोट्यातून भरावे. अंशकालीन तसेच आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यूएस ची रिक्त पदे सुद्धा अगेन्स्ट कोट्यातून तात्काळ भरण्यात यावी. १२जानेवारी २०२१ च्या पत्रानुसार कारवाई करून पात्र उमेदवारांनाच नियुक्ती द्यावी. फवारणी क्षेत्र कर्मचाऱ्यांना मजुरी पद्धतीने पगार न देता वेतनश्रेणी लागू करुन दरमहा वेळेवर पगार देण्यात यावा. अशी मागणी महाराष्ट्र राज्य हंगामी क्षेत्र कर्मचारी संघटना गडचिरोली द्वारा करण्यात आलेली आहे.