The गडविश्व
गडचिरोली : देसाईगंज शहरातील विविध वार्डात सुरु असलेली अवैध दारूविक्री तत्काळ बंद करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी शहरातील महिलांनी नगर प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे.
देसाईगंज शहरातील काही वार्डात अवैध दारू विक्री सुरु आहे. याचा वार्डातील महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील काही वार्डात अवैध दारू विक्री पूर्णत: बंद झाल्यास पुरुषांमधील दारू पिणे बंद होईल, घरात, वार्डात होणारे भांडण तंटे कमी होतील. शहरातील गुन्ह्यांच्या संख्येत घट होईल. त्यामुळे अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी सहकार्य करावे. यासाठी शहरातील अवैध दारूविक्री बंद करून, दारूबंदी अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. यासाठी नगरपरिषदेने नगर दारूमुक्तीचा प्रस्ताव पारित करून दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करा. तसेच प्रत्येक वार्डात दारू व्यसनींच्या उपचारासाठी व्यसन उपचार क्लिनिकचे आयोजन करण्यासाठी सहकार्य करा. अशी मागणी देसाईगंज शहरातील महिलांनी केली. यावेळी माजी नगराध्यक्षा शालूताई दंडवते, दोन माजी नगरसेवक व विविध वार्डातील महिला, गाव संघटनेच्या महिला, शहर दारूमुक्ती संघटनेच्या सक्रीय महिला, तसेच मुक्तीपथ तालुका संघटीका भारतीताई उपाध्ये, अनुप नंदगिरवार, प्रभाकर केळझरकर इत्यादी मंडळी हजर होते.