अवैध दारूविक्री बंद न केल्यास, आंदोलनाचा पावित्रा घेणार

251

– कुरखेडा शहर संघटना सदस्यांची बैठक संपन्न

The गडविश्व
गडचिरोली : कुरखेडा शहर संघटनेच्या सदस्यांची बैठक स्थानिक गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यालयात शुक्रवारी पार पडली. यावेळी वॉर्डा-वार्डातील अवैध दारूविक्रीसंदर्भात पोलिस विभागाला निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शहरातील अवैध दारूविक्री बंद न झाल्यास आंदोलनाचा पावित्रा हाती घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ. सतीश गोगुलवार, शुभदाताई देशमुख, गुरूदेव सेवा मंडळ अध्यक्षा सुधा नाकाडे, चरणदास कवाडकर, चैतराम दखणे, पोलिस पाटील नारायण टेंभुर्णे, रेखा रासेकर, आशा बानबले, सुशिला मरसकोल्हे, आनंदा धाडे, आशाराम जांभुळकर, मुक्तिपथ अभियानाचे उपसंचालक संतोष सावळकर, तसेच वार्ड संघटनेच्या महिला उपस्थित होत्या.
याप्रसंगी संघटनेचे पुनर्गठन करून शहरातील अवैध दारूविक्री बाबत चर्चा करण्यात आली. वार्डा-वार्डातून बैठकीसाठी आलेल्या सदस्यांनी कोणत्या वार्डात दारू विक्री सुरु आहे. आतापर्यंत दारूविक्रीसाठी कशा पद्धतीने वार्डातील संघटनांनी प्रयत्न केले आहे, याबाबत सविस्तर मांडणी केली. सदर अवैध दारूविक्री तत्काळ बंद व्हावी, यासाठी स्थानिक पोलीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्याचे ठरले आहे. निवेदनानंतरही अवैध दारूविक्री बंद न झाल्यास, त्याचे लेखी उत्तर मागणे व आंदोलनात्मक पावित्रा घेणे इत्यादी निर्णय बैठकीत घेण्यात आले.
दरम्यान वार्डात संघटना व शहर संघटना मजबूत करून दर महिन्याला याबाबत आढावा घेण्याचे ठरविले गेले. तसेच राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विकण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा जाहीर निषेध बैठकीत करण्यात आला व सदर निर्णय शासनाने मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. बैठकीचे संचालन मुक्तिपथ तालुका उपसंघटक मयुर राऊत यांनी केले तर प्रेरक विनोद पांडे यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here