– जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक संपन्न
– जिल्हा नियोजन मधून सन 2022-23 करीता 595.99 कोटींच्या प्रारुप आराखडयास मंजुरी
The गडविश्व
गडचिरोली : आज झालेल्या ऑनलाईन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आर्थिक मर्यादेत प्रस्तावित नियतव्यय 395.99 कोटी व अधिक 200 कोटी अतिरीक्त मागणी असा मिळून 595.99 कोटींच्या प्रारुप आराखडयास 2022-23 करीता मंजूरी देण्यात आली. जिल्हयाचे पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेणेत आली. या मंजूर प्रारुप आराखडयात सर्वसाधारण योजनेत 222.36 कोटी, आदिवासी उपयोजने साठी 137.52 कोटी, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी 2.10 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 34.0 कोटी,व अतिरीक्त 200 कोटी रुपयांचा असा मिळून 595.99 आराखडा सादर करण्यात आला होता.आता सदर आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार, खा. अशोक नेते, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रामदास आंबटकर, विधान परिषद सदस्य आ. अभिजीत वंजारी, आ. धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, आ. कृष्णा गजबे तसेच सर्व सन्माननिय सदस्य उपस्थित होते. प्रशासनातील जिल्हयाचे पालक सचिव तथा प्रधान सचिव वन विभाग मिलींद म्हैसेकर, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांचे सह प्रत्येक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना गडचिरोली मधील विकासात्मक कामांबाबत आवाहन केले. ते म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागासाठी, मागास भागासाठी जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती होणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी परस्पर समन्वयातून योजनांची अंमलबजावणी करावी. 595 कोटी आपल्याला मिळतीलच परंतू मी अधिकचा निधी जिल्ह्यासाठी मागणार आहे. मागील वर्षातील प्राप्त 454 कोटी मधून आजपर्यंत 50 टक्केच निधी खर्च झाला आहे. उर्वरीत निधीसाठी आचारसंहिता असल्याने अडचण होती. आती ती संपल्यानंतर 31 मार्च पुर्वी सर्व निधी खर्च होईल याकडे सर्वांनी लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
◾#गडचिरोली जिल्हा नियोजन मधून सन 2022-23 करीता 595.99 कोटींच्या प्रारुप आराखडयास मंजुरी
◾जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
◾आदिवासी जिल्हयातील सामान्यांसाठी जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती व्हावी- पालकमंत्री @mieknathshinde pic.twitter.com/gFClu4o89S— DISTRICT INFORMATION OFFICE, GADCHIROLI (@InfoGadchiroli) January 18, 2022
जिल्ह्यात ‘क’ वर्ग पर्यटन यादीत 6 ठिकाणांचा समावेश
गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमध्ये ‘क’ वर्ग या प्रकारात 6 स्थळांचा नव्याने समावेश करण्याच्या ठराव संमत करण्यात आला. यात पुष्कर महामेळा ज्या ठिकाणी भरतो तेथील प्राणहिता नदीवरील सिरोंचा घाट, नगरम घाट व टेकाडा घाट यांचा समावेश आहे. त्यानंतर वडधम फॉसिल पार्क, गडचिरोली शहरातील मा.मा. तलाव, लांजेडा येथील तलाव अशा सहा ठिकाणांचा समावेश ‘क’ वर्ग पर्यटन स्थळांमध्ये करण्यात आला आहे. यामूळे संबंधित ठिकाणी पर्यटन विषयक कामे करण्यात येणार आहेत.
कमलापूर हत्तींबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
कमलापूर येथील हत्ती कॅम्प मधील काही हत्तींना इतरत्र हलविण्यात येणार असल्याच्या मुद्यांवरुन सदस्यांनी चर्चा केली. यावेळी मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी माहिती सादर केली. यावर पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील जनभावना विचारात घेवून आपण याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री महोदय निश्चित सकारात्मक तोडगा काढतील असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार महोदयांना आश्वासन दिले.
झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील धान खरेदी, वनपट्टेधारकांचे 7/12 नमुने वाटप करणे, विकास कामातील गुणवत्ता, सुरजागड खनिज प्रकल्पातील स्थानिकांना रोजगार तसेच घरकूल बांधकाम अशा विविध विषयांवर चर्चा झाली. मागील सभेतील अनुपालन व प्रारूप आराखड्याचे सादरीकरण जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले. शेवटी सभेतील सहभागाबाबत जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादुर तिडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.