-पोलिस विभागास निवेदन सादर
The गडविश्व
गडचिरोली : गावात सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे गावातील युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांवर कारवाई करून अवैध दारूविक्री बंद करा, अशी विनंती एटापल्ली तालुक्यातील हेडरी मुक्तिपथ गाव संघटनेसह गावकऱ्यांनी निवेदनातून हेडरी पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी यांना सादर करून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हेडरी गावात सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीमुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. गावातील मद्यपी नागरिकांमुळे घरामध्ये भांडण होत आहेत. मोल, मजुरी करून कमावलेला पैसा दारूच्या व्यसनावर खर्च केला जात आहे. तसेच गावातील शांतता पूर्णतः भंग झाली आहे. त्यामुळे गावातून अवैध दारू हद्दपार करणे गरजेचे आहे. यासाठी पोलिस विभागाने पुढाकार घेऊन गावातील विक्रेत्यांवर कारवाई करावी व अवैध दारूविक्री बंद करावी, अशी मागणी प्रभारी अधिकारी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन देतांना माजी पोलिस पाटील देवू कवडो, उपसरपंच राकेश कवडो, चिन्ना सडमेक, राधा तेलामी, ललित हिचामी, लिमी लेकामी,रासो उसेंडी, पिली कवडी, नोवरी पुंगाटी, पिली लेकामी यांच्यासह मुक्तिपथ गाव संघटनेचे सदस्य, गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.