– अन्यथा १० जानेवारी २०२२ पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
THE गडविश्व
देसाईगंज : गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम आदिवासी व नक्षलग्रस्त असून कोणतेही मोठे उद्योग नसल्याने तेथील नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहे. येथील शेतकरी सिंचन सुविधेसाठी २४ तास विजेवर अवलंबून असताना ८ तास वीजपुरवठा करण्यात येणार असल्याने येथील शेतकरी अधिकच अडचणीत येण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील कृषी पंपाना पूर्वीप्रमाणे २४ तास सुरळीत विज पुरवठा देण्यात यावा,अन्यथा विरोधात १० जानेवारी २०२२ पासून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पञातुन घेतली असल्याने संबंधित विभागात एकच खळबळ माजली आहे.
दिलेल्या पञात त्यांनी म्हटले आहे की गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा असुन अतिदुर्गम, अतिसंवेदनशील भागात वसलेला आहे.जिल्ह्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्याने येथील नागरिक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. खरीप हंगामात आलेला अवकाळी पाऊस,चक्रिवादळ तसेच धान पिकावर प्रचंड प्रमाणात मावा तुडतुड्याच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात प्रचंड घट आली असुन उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांना रब्बी/उन्हाळी धान पिक घेणे गरजेचे झाले आहे.करीता कृषी पंपाना २४ तास वीजपुरवठा अत्यावश्यक आहे. असे असताना व शेतकऱ्यांना जगवण्यासाठी सुरळीत विज पुरवठा करणे अत्यावश्यक असताना विज वितरण कंपनिकडुन ८ तास वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे सुचित करण्यात आले आहे.यामुळे १६ तासाचा खंड पडत असल्याने खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांचे ओलित करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार असुन यामुळे संपुर्ण पिकच धोक्यात येऊन उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाल्याने येथील शेतकरी पुरते धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे.
ही गंभीर बाब लक्षात घेता राज्याचे ऊर्जामंत्री व गडचिरोलीचे पालकमंत्री यांच्याकडे संदर्भिय कार्यालयीन पञ क्रमांक ६१०/२०२१ अन्वये ४ डिसेंबर २०२१ रोजी येथील समस्या अवगत करुन देण्यात आली आहे.याबाबत समस्येचे निराकरण होणे बाकी असताना विज वितरण कंपनिकडुन ८ तास वीजपुरवठा करण्याचे सूचित करण्यात आले असल्याने येथील शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपाना सुरळीत २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा. अन्यथा विरोधात १० जानेवारी २०२२ पासून देसाईगंज येथील विज वितरण कंपनिच्या उपविभागीय कार्यालया समोर चक्काजाम आंदोलनासह ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार कृष्णा गजबे यांनी दिला असुन तशा आशयाचे पञ येथील उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत गडचिरोली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. याबाबत काय निर्णय घेतल्या जाते याकडे येथील शेतकऱ्यांचे लक्ष लागुन आहे.
निवेदन देताना आमदार कृष्णा गजबे यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.