The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, ३ ऑक्टोबर : स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं. वाणिज्य महाविद्यालय, आरमोरी येथे प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महाराष्ट्रात १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२२ हा पंधरवडा स्वच्छ अमृत महोत्सव म्हणून पार पाडण्याचे ठरविले. या उपक्रमाची अंमलबजावणी म्हणून महाविद्यालयाच्या रासेयो विभागाकडून उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत डोर्लीकर, रासेयो प्रमुख प्रा. सतेंद्र सोनटक्के व डॉ. सीमा नागदेवे यांच्या नेतृत्वात महात्मा गांधी महाविद्यालयाचे विद्यार्थी स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी महाविद्यालयाच्या वर्गखोल्या, जीना, व्हरांडा, कार्यालय, क्रीडांगण, महाविद्यालय परिसर, कॅरीडोअर व महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापुढील कचरा यांची स्वच्छता करून महाविद्यालयीन परिसर स्वच्छ केला.
रासेयो अधिकाऱ्यांकडून नियोजित या कार्यक्रमास महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या १२ तुकड्यांनी आपआपल्या विद्यार्थी चमूचे सहकार्य घेऊन महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केल्याबद्दल आणि स्वच्छता पंधरवडा यशस्वीरित्या राबविल्याबद्दल प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा यांचेकडून रासेयो विभागाचे आणि सहकारी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि आभार व्यक्त केले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केल्याबद्दल रासेयो अधिकारी, प्राध्यापक यांनी आभार मानले.