– आमदार कृष्णा गजबे यांची उर्जा मंत्र्यांकडे मागणी
The गडविश्व
देसाईगंज : आदिवासी बहुल नक्षलग्रस्त,उद्योग विरहित
गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा,आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना नऊ कृषी वाहिन्यांतुन २४ तास वीजपुरवठा करण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे उर्जा मंत्री डाॅ. नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की गडचिरोली जिल्हा हा आदिवासी,अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असुन याठिकाणी कोणतेही मोठे उद्योग व्यवसाय नाहीत.त्यामुळे या भागातील नागरिक केवळ शेती व्यवसायावर अवलंबून असुन येथील शेतकरी मुख्यतः धान पिकाचे उत्पादन घेतात.
सदर पिकाच्या सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यक असते माञ मागील वर्षभरापासून आरमोरी तालुक्यातील आरमोरी विज उपकेंद्रातील ३, देसाईगंज तालुक्यातील वडसा विज उपकेंद्रातील १,शंकरपुर विज उपकेंद्रातील ३ तसेच कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा विज उपकेंद्रातील २ अशा एकूण ९ कृषि विज वाहीन्यातुन कृषि पंपांना केवळ ८ तास पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे तिन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असुनही विजे अभावी शेतकऱ्यांना पिकाचे सिंचन करता येत नाही.त्यामुळे शेतक-यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.याकरिता आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाकडे निवेदनातून वारंवार मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन स्वतःला पोलीसांकडून अटक सुद्धा करुन घेतली.
मात्र अद्यापही मागण्या पूर्ण करण्यात आल्या नसुन आरमोरी,देसाईगंज व कुरखेडा तालुक्यातील नऊ कृषि विज वाहीन्यांवर भार नियमन लागु करण्यात येवून शेतकऱ्यांना केवळ ८ तास विज पुरवठा करण्यात येत आहे.यामुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये त्यांचेवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.याबाबत सातत्याने पाठपुरावा करुनही कृषि पंपांना पुर्वी प्रमाणे २४ तास विज पुरवठा करण्यात येत नसल्याने अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उद्वीग्न होत नक्षल चळवळीत सहभागी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करुन आमदार कृष्णा गजबे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदीय आयुधाच्या माध्यमातून २४ तास विज पुरवठा करण्याची मागणी केली होती.त्यावर उर्जा मंञ्यांनी सकारात्मक भुमिका सुद्धा घेतली माञ अधिवेशन संपायला केवळ २ दिवसांचा कालावधी शिल्लक असतांनाही मागणी पूर्ण झाली नसल्याने आमदार कृष्णा गजबे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पक्षभेद बाजुला ठेवून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम व माजी आमदार रामकृष्णजी मडावी यांना सोबतीला घेऊन परत विधानभवनात राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांची भेट घेऊन समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्या अनुषंगाने उर्जा मंञ्यांनी महावितरण चे संचालक (संचालन)यांना तत्काळ उचित कारवाई करण्या संदर्भात निर्देश दिले.
तथापी आमदार गजबे यांनी सदर निवेदनाची प्रत गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना सुद्धा देण्यात आली असुन दोन्ही मंत्र्यांनी महावितरण ला तातडीने मागणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आरमोरी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना मुबलक विज पुरवठा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.