– घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून राख
The गडविश्व
भंडारा : उंदराने देवघरातील दिव्याची पेटती वात पळवल्याने घराला आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून राख झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे गुरुवारी घडली. या घटनेमुळे घर मालकाचे जवळपास ७० हजारांचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे.
मांढळ येथील तुळशीराम पिलारे (६५) यांच्या कुटुंबातील मंडळी गुरुवारी लग्न कार्यासाठी बाहेर गावाला गेले होते. घरात वच्छला पिलारे ही वृद्ध महिला एकटीच होती. यांनी नेहमीप्रमाणे देवघरात दिवा लावला आणि घराबाहेर बसल्या दरम्यान घराला अचानक आग लागली. पाहता पाहता संपूर्ण घर आगीच्या कवेत आले. गावकऱ्यांनी लागलीच धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत घरातील अन्नधान्य व इतर संसारोपयोगी साहित्य जाळून राख झाले होते. यात ७० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती असून देवघरातील दिव्याची वात उंदराने पळविली आणि ती वात घरातील कपड्यांवर पडून आग लागल्याची माहिती देण्यात आली. या घटनेची माहिती तहसीदार याना होताच तलाठ्यांना पंचनामा करण्याचे निर्देश दिले. तर लवकरात लवकर पिलारे कुटुंबास मदत देण्यात यावी अशी मागणी गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.