उपचारातून व्यसनाचे आजार दूर होण्यास मदत

187

– आठवडाभरात ७० रुग्णांची क्लिनिकला भेट
The गडविश्व
गडचिरोली : दारूचे व्यसन हे एक मानसिक आजार असून आजारातून मुक्त होण्यासाठी उपचार घेणे गरजेचे आहे. यासाठी मुक्तिपथ अभियानाने तालुका मुख्यालयात उपचाराची सोय उपलब्ध करून दिली आहे. मागील आठवड्यात विविध तालुक्यातील एकूण ७० रुग्णांनी क्लिनिकला भेट देत व्यसनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे.
गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यातील गरजू लोकांना आवश्यक वेळी उपचार मिळावे, यासाठी मुक्तिपथने गावागावात व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन करणे सुरु केले आहे. या शिबिरांना गावकऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद सुद्धा लाभत आहे. तसेच तालुका मुख्यालयातील कार्यालयात नियोजित दिवशी तालुका क्लिनिकचे आयोजन केले जाते. यामुळे दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याची इच्छा असलेल्या रुग्णांना मोठ्या शहरांप्रमाणेच आपल्या तालुक्यातच उपचाराची सोय उपलब्ध होत आहे.
तालुका क्लिनिक व गाव पातळी शिबिरांच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्हाभरातील अनेक रुग्णांनी उपचार घेतला आहे. उपचारापुरतेच मर्यादित न राहता त्या रुग्णांचा मासिक पाठपुरावा देखील करण्यात येतो. यातून रुग्णाची सध्यास्थिती जाणून घेत पुढील उपचार केला जातो. आदिवासी बहुल भागातील नागरिकांनासुद्धा या उपक्रमाचा लाभ होत आहे. मागील आठवड्यात सोमवारी गडचिरोली तालुका क्लिनिकमध्ये ९, बुधवारी भामरागड १०, धानोरा ७, देसाईगंज ९, गुरुवारी एटापल्ली ११ व शुक्रवारी चामोर्शी १०, अहेरी ७ व कोरची ७ अशा एकूण ७० रुग्णांनी उपचार घेत व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here