The गडविश्व
चंद्रपूर : कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत वेळोवेळी रोग व किडींचे सर्वेक्षण करून त्यांचा प्रादुर्भाव, प्रमाण, नुकसानीची पातळी ठरवून कमी खर्चाची जैविक कीटकनाशके, कामगंध सापळे इत्यादीचा वापर प्राधान्याने करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे व त्यातून पिकाचे संरक्षण व उत्पादन खर्चात बचत करणे आवश्यक झाले आहे. त्यासोबतच “एक दिन सरपंच के साथ” अभियानाच्या माध्यमातून कृषी विभागातील विविध कल्याणकारी योजनांची माहिती थेट गावपातळीवर पोहोचवण्यासाठी प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या शनिवारी गावातील सरपंच, कृषी विभागातील कृषी मित्र, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व आत्मा अंतर्गत बीटीएम यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने थेट संवाद साधण्यात येणार असून कृषी विभागातील विविध योजना व विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
शनिवार 12 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 ते 12 या कालावधीत उपविभागीय कृषी अधिकारी, चंद्रपूर अंतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, मुल व सावली, वरोरा उपविभागांतर्गत वरोरा, भद्रावती व चिमूर तर दुपारी 2 ते 4 या कालावधीत उपविभागीय कृषी अधिकारी, नागभिड विभागाअंतर्गत नागभीड, ब्रह्मपुरी व सिंदेवाही तर राजुरा उपविभागांतर्गत राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी व पोंभूर्णा तालुक्यातील सरपंच, कृषी विभागातील कृषी मित्र, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व आत्मा अंतर्गत बीटीएम यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने थेट संवाद साधण्यात येणार येणार आहे.
यामध्ये कृषी विभागातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, शेतकरी सन्मान व मार्गदर्शन कक्ष, फळबाग लागवड योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान भात कार्यक्रमाअंतर्गत भात शेतीमध्ये मत्स्यपालन, स्थानिक वाणांची लागवड, मिनी राईस मिल बाबत माहिती, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्य कार्यक्रमांतर्गत मिनी दाल मिल, गळित धान्य व तेलताड कार्यक्रमांतर्गत शेततळे, सुधारित कृषी अवजारे, पीक स्पर्धा, कृषी पायाभूत निधी, कृषी केंद्रांमधून निविष्ठा खरेदी करतांना घ्यावयाची काळजी इत्यादी योजना व विषयांवर चर्चा होणार आहे.