The गडविश्व
मुंबई : उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्याने नैराश्येतुन विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हनुमंत चंद्रकांत अकोसकर असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा’, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला आता तीन महिने होत आले तरी अद्याप तोडगा निघालेला नाही. या मागणीवर निर्णय होईपर्यंत संप कायम ठेवण्याची भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
या तीन महिन्यांच्या काळात अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आज उस्मानाबादमध्ये हनुमंत चंद्रकात आकोसकर यांनी विष प्राशण करून आत्महत्या केली.
हनुमंत आकोसकर तुळजापूर डेपोमध्ये वाहक म्हणून काम करत होते. विलीनीकरणासाठी पुकारलेल्या आंदोलनात त्यांनी पहिल्या दिवसापासून सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी ते रोजंदारी काम करत होते .आंदोलनाला शंभर दिवस उलटले तरी मार्ग निघत नसल्याने ते गेल्या काही दिवसांपासून नैराश्यात होते. घरचा खर्च कसा भागवायचा, मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कुठून आणयाचा या चिंतेने त्यांना ग्रासले होते. अखेर याच नैराश्यातून त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली.
त्यांच्या मागे आई-वडिल, पत्नी आणि दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे. हनुमंत यांच्या आत्महत्यने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.