शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या आरोपीस सक्त मजुरी व दंडाची शिक्षा

507

– मुख्य न्यायदंडाधिकारी एम.आर वाशीमकर यांचा न्यायनिर्वाळा
The गडविश्व
गडचिरोली : गावातील ग्रामपंचायतीच्या विहिरीवर पाणी भरत असताना आरोपीने शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याप्रकरणी विद्यमान मुख्य न्यायदंडाधिकारी एम.आर. वाशिमकर यांनी आरोपीस ६ महिने सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा आज १ एप्रिल २०२२ रोजी ठोठावली आहे. ऋषी नामदेव लोणबले असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार २ जून २०१९ रोजी यातील फिर्यादी हे रात्रो ८ वाजताच्या सुमारास गावातील ग्रामपंचायतीच्या विहिरीवर पाणी भरत होते दरम्यान आरोपी रुषी नामदेव लोनबले हे दारू पिऊन घराला पाणी मारत असतांना ग्रामपंचायततिच्या विहिरीवर गेले व फिर्यादीस शिवीगाळ करून काठीने मारहाण केली यात फिर्यादीच्या डोक्याला जखम झाली व जखमी झाले. याबाबत फिर्यादीने पोलीस स्टेशन गडचिरोली येथे तोंडी रिपोर्ट दाखल केली यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपासात घेतला. गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार सुनील बेसकर यांनी पूर्ण करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा आल्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून न्यायालयात खटला चालवण्यात आला. सरकारतर्फे फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयान तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आज १ एप्रिल २०२२ रोजी आरोपी ऋषी नामदेव लोनवले यास मुख्य न्यायदंडाधिकारी एम.आर. वाशीमकर यांनी कलम ३२४ भादवी मध्ये ६ महिने सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अमर फुलझेले यांनी काम पाहिले तसेच गुन्ह्याचा तपास गडचिरोली पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार सुनील बेसकर यांनी केला. तसेच पोलीस हवालदार यशवंत मलगाम व पोलीस शिपाई हेमराज बोधनकर यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here