– वनविभागात खळबळ, मृत्यूचे कारण गुलदस्त्यात, शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण होणार स्पष्ट
The गडविश्व
भंडारा : जिल्हयातील तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्र बपेरा आंबागड गाव शिवारातील बावनथडी कालव्यात पट्टेदार नर वाघ मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. सदर घटना ३१ मार्च रोजी सायंककाळी 4 ते 5 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मात्र सदर वाघाचा मृत्यू कसा झाला याचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर नेमके मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
काल ३१ मार्च रोजी बावणथडी प्रकल्पाच्या छोट्या कालव्यामध्ये वाघ मृतावस्थेतआढळल. याबाबत माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व मृत वाघाचे शव कालव्या बाहेर काढले व शवविच्छेदन करण्याकरिता पाठविण्यात आले. नेमका वाघाचा मृत्यू कशामुळे झाला याचे अद्याप कारण कळू शकले नाही. वाघाला तहान लागली असावी व तो पाणी पिण्याकरिता कालव्यात गेला असावा व नंतर त्याला बाहेर निघता आले नसावे व शेवटी त्याचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. लेंडेझरी वनपरिक्षेत्र हे मध्य प्रदेश लगत आहे. मध्यप्रदेशातील शिकारी टोळ्या दरवर्षी उन्हाळ्यात जंगलात दाखल होतात त्यांनी घातपात तर केला नसावा असा संशय सुद्धा वर्तविण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.